Tharala Tar Mag Fame Arjun : ‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या आठवड्यात वात्सल्य आश्रम केसचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. मधुभाऊंना निर्दोष सोडवण्यासाठी अर्जुनला फक्त ३० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. या संधीचं अर्जुन सोनं करतो आणि गुन्हा सिद्ध झाल्यावर साक्षी-प्रियाची रवानगी जेलमध्ये केली जाते.

गेल्या अडीच वर्षांपासून प्रेक्षक या जबरदस्त ट्विस्टची आतुरतेने वाट पाहत होते. निकाल जाहीर होताना ‘ठरलं तर मग’च्या प्रत्येक एपिसोडबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून वात्सल्य आश्रम केसचा निकाल काय लागेल याबद्दल घराघरांत चर्चा झाली. लोकांना हा संपूर्ण सीक्वेन्स खूपच आवडला, यासाठी मालिकेच्या सगळ्या टीमने दिवसरात्र मेहनत केली होती. याची पोचपावती ‘ठरलं तर मग’च्या टीमला टीआरपीच्या स्वरुपात मिळाली आहे.

मालिकेत ज्या दिवशी कोर्ट केसचा निकाल जाहीर करण्यात आला, त्या विशेष भागाला तब्बल ९.१ TVR रेटिंग मिळालं आहे. यादिवशी तब्बल २.७ कोटी प्रेक्षकांनी ‘ठरलं तर मग’ मालिका पाहिली. याशिवाय या मालिकेचा गेल्या आठवड्याचा टीआरपी ७.१ एवढा आहे. यापूर्वी कोणत्याही मालिकेला अडीच वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात टीआरपी रेटिंग मिळालेलं नाही. त्यामुळे या मालिकेने सगळे रेकॉर्ड्स मोडले आहेत.

या यशाबद्दल अर्जुन सुभेदारची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अमित भानुशालीने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अर्जुन लिहितो, “ठरलं तर मग’ मालिकेच्या अभूतपूर्व यशामागे आमच्या संपूर्ण टीमचे कष्ट तर आहेतच पण, या सगळ्यात सर्वात मोठं योगदान आहे ते आमच्या प्रेक्षकांचं, त्यांच्या प्रेमाचं आणि पाठिंब्याचं. ज्या दिवशी केसचा निकाल जाहीर करण्यात आला त्यादिवशी TVR आहे ९.१ आणि त्या एकाच दिवशी तब्बल २.७ कोटी प्रेक्षकांनी आमची मालिका पाहिली. हे सर्व फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्यावर राहू द्या. आम्ही आज इथवर तुमच्यामुळेच पोहोचलो आहे आणि पुढेही असंच यश मिळवायचं आहे.”

दरम्यान, अर्जुनप्रमाणे सायली, कल्पना, कुसुम, प्रतिमाही सगळी पात्र साकारणाऱ्या कलाकारांनी सुद्धा टीआरपी आकडेवारी समोर आल्यावर प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.