Tharala Tar Mag Fame Jui Gadkari Stuck In Traffic : पावसाळा सुरू झाल्यापासून मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांना मुंबई – ठाण्यातून प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे शूटिंगला किंवा नियोजित ठिकाणी पोहोचण्यास १-२ तास उशीर होत असल्याचंही काही कलाकारांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट, व्हिडीओ शेअर करत वाहतूक कोंडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आता मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरीने हिने देखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाल्याचं म्हटलं आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जुई गडकरीची इन्स्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेत आली आहे. मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. यामुळे बहुतांश ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

जुई गडकरी दहिसर टोलनाका परिसरात वाहतूक कोंडीत अडकली होती. अभिनेत्री लिहिते, “अर्धा तास झाला मी या वाहतूक कोंडीत अडकले आहे. ठिकाण- दहिसर टोलनाका…” या कॅप्शनमध्ये जुईने चिडलेला, संताप व्यक्त करणारा इमोजी दिला आहे. या पोस्टसह अभिनेत्रीने वाहतूक कोंडीचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

दरम्यान, जुई गडकरी प्रमुख भूमिका साकारत असलेल्या ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ही सीरियल ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रात्री ८.३० वाजता प्रसारित केली जाते. या मालिकेत जुईसह अमित भानुशाली प्रमुख भूमिका साकारत आहे. ऑन एअर झाल्यापासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालिकेत सध्या काय सुरू आहे?

सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन आणि सायली मिळून मधुभाऊंना निर्दोष कसं सिद्ध करता येईल याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे प्रियाच्या कुरघोडी सुरूच आहेत. अशातच मालिकेत अस्मिताची एन्ट्री पुन्हा एकदा झालेली आहे. अस्मिताची भूमिका अभिनेत्री मोनिका दबाडे साकारत आहे. गरोदर असल्याने मोनिकाने मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र, आता ३ महिन्यांच्या लेकीसह अभिनेत्री सेटवर परतली आहे.