Tharala Tar Mag Dialogue Writer Shilpa Navalkar : ‘ठरलं तर मग’ मालिका गेल्या अडीच वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. याचं श्रेय जेवढं मुख्य कलाकारांचं आहे तेवढंच पडद्यामागे काम करणारे दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ आणि लेखकांचं सुद्धा आहे. ‘ठरलं तर मग’ची संवाद लेखिका स्वत: या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. त्या स्क्रिप्ट लिहिताना विरंगुळा म्हणून हास्यजत्रा पाहतात याविषयी या अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
आता अनेकांना प्रश्न पडला असेल, मालिकेची संवाद लेखिका नेमकी आहे तरी कोण? ‘ठरलं तर मग’ मध्ये तन्वीच्या आईची ‘प्रतिमा’ ही भूमिका लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी साकारली आहे. त्याच या मालिकेच्या संवाद लेखिका आहेत.
शिल्पा नवलकर यांनी नुकतीच ‘फिल्मी मराठी KMW’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीने त्या ‘ठरलं तर मग’ची स्क्रिप्ट हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहत लिहितात असा खुलासा केला आहे.
शिल्पा नवलकर सांगतात, “माझा नवरा आणि मी आम्हा दोघांनाही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रचंड आवडतो. अनेकदा असं होतं की डोळ्यावर झापड येते पण, काही करून संवाद पूर्ण करू द्यायचे असतात. अर्थात, मालिकाविश्वात काम करताना असे अनुभव येतच असतात. अशावेळी हास्यजत्रा पाहत मी काम पूर्ण करते. त्यावेळी मला असं जाणवतं की समजा आता स्क्रीनवर समीर चौघुले नसता किंवा नम्रता संभेराव नसती तर मला खूप जड गेलं असतं. ही माणसं सतत अप्रत्यक्षरित्या का होईन हास्यजत्रेच्या माध्यमातून माझ्याबरोबर असतात आणि माझं मनोरंजन होतं.”
“हास्यजत्रेचे सगळेच कलाकार मनापासून आपलं मनोरंजन करतात. मी त्यांचे सगळे स्किट्स मनापासून पाहते, अगदी १५-१५ वेळा मी त्यांचं एक स्किट पाहिलेलं आहे. आता एखादं स्किट आधी पाहिलेलं असेल तरीही, ते स्किट पुन्हा पाहताना मी तशाच पद्धतीने हसत असते. यामुळे मला एक एनर्जी मिळते आणि त्यामुळे माझं काम सतत चालू राहतं.” असं शिल्पा नवलकर यांनी सांगितलं.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ही मालिका रोज रात्री ८:३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केली जाते. यामध्ये शिल्पा नवलकर ( प्रतिमा ) यांच्यासह जुई गडकरी, अमित भानुशाली, केतकी पालव, प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
