‘ठरलं तर मग’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट रोजी निधन झालं. ५३ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. गेल्या अडीच वर्षांपासून ज्योती चांदेकर पूर्णा आजीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत होत्या. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. मालिकेतील कलाकारांनी भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्या लाडक्या पूर्णा आजीला अखेरचा निरोप दिल्याचं पाहायला मिळालं.

मात्र, आता ‘ठरलं तर मग’ मालिकेत इथून पुढे पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. मालिकेच्या असंख्य चाहत्यांनी कमेंट्समध्ये पूर्णा आजीची भूमिका कधीच रिप्लेस करू नका अशी विनंतीही चॅनेलला केल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘ठरलं तर मग’च्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी यासंदर्भात रिप्लेसमेंटवर सविस्तर चर्चा करून, कथेची गरज लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, अजूनही आम्ही कोणीच या धक्क्यातून सावरलेलो नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. आता मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अमित भानुशालीने याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण होणार असल्याने अमित भानुशालीने इन्स्टाग्राम लाइव्हवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी “पूर्णा आजीची रिप्लेसमेंट कोण करणार आहे?” असा प्रश्न त्याला चाहत्याकडून विचारण्यात आला. यावर अमित भानुशाली म्हणाला, “तुम्हाला खरंच सांगतो…अजूनपर्यंत आम्ही कोणीच या गोष्टीचा विचारही केलेला नाहीये. आम्ही कोणीच या धक्क्यातून अजूनही सावरलेलो नाही आहोत. त्यामुळे पुढे काय निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ मंडळी ठरवतील. चॅनेल आणि प्रोडक्शन टीम ठरवेल. पण, इतकं सांगतो, आम्ही कोणीही कधीच पूर्णा आजीला विसरणार नाही आणि तिची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही.”

मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले म्हणाले, “तिची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही आणि तिला आम्ही कधीही विसरू शकत नाही…पण, हा एक शो आहे. याबाबत मालिकेच्या कथानकानुसार विचार केला जाईल. आम्हाला लवकरच जो काही निर्णय असेल तो कळेल.”

“पूर्णा आजी आहेत आणि नेहमी आमच्याबरोबरच राहतील…त्या कधीच कुठेही गेल्या नाहीयेत. ती सेटवर येताना असं बास्केट भरून खाऊ आणायची. आमच्यासाठी पुण्याहून येताना खास क्रीम रोल घेऊन यायची. जवळपास क्रीम रोलचे ८ ते १० बॉक्स तिने आमच्यासाठी आणले होते. ती सगळ्यांसाठी खाऊ घेऊन यायची आणि तिला गोड खूपच आवडायचं. तिच्या असंख्य आठवणी आहेत त्यामुळे आम्ही पूर्णा आजीला कधीच विसरू शकत नाही.” असं अमित भानुशालीने सांगितलं.