माणसाच्या शारीरिक स्वास्थाबरोबरच त्याचे मानसिक आरोग्य निरोगी असणे, अत्यंत महत्त्वाचे असते. मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी आजूबाजूला घडताना दिसतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही चांगल्या काही वाईट घटना घडत असतात. अनेकदा त्यातील काही गोष्टींचा परिणाम माणसावर होतो. त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडते. आता अभिनेत्री मीरा जगन्नाथ(Mira Jagannath)ने तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारी कोणती घटना घडली होती, याबद्दल एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे.

अभिनेत्री मीरा जगन्नाथने नुकतीच ‘सुमन म्युझिक मराठी’ या यूट्यूब चॅनेलवर आम्ही असं ऐकलंय या भागात हजेरी लावली होती. त्यावेळी तिला विचारण्यात आले की, मानसिक आरोग्य जपण्यासाठी तू काय करतेस? त्यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “मला एक किस्सा सांगायला आवडेल. दोन वर्षापूर्वी मला भयंकर त्रास झाला होता. कारण- खूप गोष्टी एकाच वेळी चालू होत्या. बिग बॉसमधून बाहेर आले होते. काम मिळत होतं. पण, तरीसुद्धा काम मिळाल्यानंतर माझ्याबद्दल बोललं जायचं. उदाहरणार्थ, अरे आम्ही इंडस्ट्रीमध्ये एवढी वर्षं आहोत. आम्हाला काम मिळत नाही, यांना मिळतं वगैरे असं बोललं जायचं. हे मी ऐकलेलं आहे. माझ्या तोंडावर खूप जवळची मैत्रीण असल्यासारखे वागले जायचे. त्यामुळे त्यावेळी माझी मैत्रीण माझ्याबद्दल असं बोलते, याचा मला धक्का बसला होता. त्यानंतर मला खूप त्रास झाला होता. मी खूप रडले होते.”

“मी म्हटलं होतं की, अनोळखी व्यक्ती जर हे बोलली असती ना तर चाललं असतं. पण, माझ्या मैत्रीण अशा प्रकारचं बोलली तेव्हा मी शॉकमध्ये गेले होते. अशा व्यक्तींशी आयुष्यात संपर्कात राहत नाही. पण, माणसाचा स्वभाव बदलत राहतो. मी दोन वर्षांपूर्वी वेगळी असेल, पाच वर्षांपूर्वी वेगळी असेल, एक वर्षापूर्वी वेगळी असेल. आता काही महिन्यांमध्ये मी अजून बदलली आहे. आता समोर येऊन मला ती बोलली की मीरा कशी आहेस? तर मी गळाभेट घेईन. मी आता हा विचार करते की, या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. ते लोक बोलतात. कारण- त्य़ांना माझी प्रगती बघवत नाहीये. ते बोलतात कारण, त्यांना माझं छान झालेलं सहन होत नाही, मी हा विचार करते आणि पुढे जाते.”

पुढे मीरा म्हणाली, “जसं तुमचं वाईट चिंतणारे असतात, तसं तुमच्या आयुष्यात काही चांगले मित्रही असतात. मी सतत म्हणत असते की, लग्न नाही करायचं वगैरे. पण, माझे जे जवळचे मित्र आहेत ती मुलंच आहेत. मला एकही मैत्रीण नाही. ते मला छान गोष्टी सांगतात. इंडस्ट्रीमध्ये कसं राहायला पाहिजे, याबद्दल समजावतात. हे मित्र इंडस्ट्रीमधील नाहीत; बाहेरचे आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मीरा जगन्नाथ ही खलनायिकांच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिने ठरलं तर मग, माझ्या नवऱ्याची बायको अशा गाजलेल्या मालिकांतून काम केले आहे. तसेच बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून ती सहभागी झाली होती. तिच्या रोखठोक वागण्यामुळे ती मोठ्या चर्चेत आली होती. नुकतीच ती इलू इलू १९९८ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.