Tharala Tar Mag Fame Sayali Arjun : ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाचं चौथं पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. धिंगाणाच्या मंचावर ‘ठरलं तर मग’ मालिकेची टीम केव्हा येणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो खास एपिसोड येत्या वीकेंडला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सायली, अर्जुन, प्रिया हे मालिकेतील सगळे कलाकार ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या येत्या भागात सहभागी होणार आहेत.

मात्र, यंदा मंचावर नेहमीपेक्षा काहीतरी खास घडणार आहे. अर्जुनला यापूर्वी बासरी वादन करताना अनेकांनी पाहिलंय. पण, सायलीला या एपिसोडमध्ये पहिल्यांदाच सगळेजण पियानो वाजवताना पाहणार आहेत. सायली-अर्जुन एकत्र येऊन पहिल्यांदाच धिंगाणाच्या मंचावर ग्रँड पियानो आणि बासरी वाजवून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. याचा खास प्रोमो वाहिनीने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘स्टार प्रवाह’ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सायली पियानो वाजवत असल्याचं आणि अर्जुन मंत्रमुग्ध होऊन बासरी वाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी दोघंही ‘ठरलं तर मग’च्या शीर्षक गीताची धून वाजवतात. यानंतर सायली ‘सर सुखाची श्रावणी’ हे गाणं गाते. तिच्या सुमधूर आवाजाचं आणि या जोडीच्या हिडन टॅलेंटचं सर्वत्र कौतुक होत आहे.

पियानो आणि बासरी वाजवल्यावर सायली-अर्जुन रोमँटिक गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळतंय. यानंतर अर्जुन गुडघ्यावर बसून सायलीला हार्ट शेपचा फुगा देतो. सायली सुद्धा आनंदाने त्याची ही भेट स्वीकारते. या विशेष भागात हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “आम्ही याच गोष्टीची वाट पाहत होतो की कधी एकदा धिंगाणाच्या मंचावर ठरलं तर मगची टीम येतेय”, “वॉव याला म्हणतात परफॉर्मन्स… या एपिसोडची आम्ही वाट पाहू”, “सुंदर! शब्दही कमी पडतील इतकं सुंदर”, “सुंदर सादरीकरण” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत.

दरम्यान, ‘आता होऊ दे धिंगाणा ४’चा हा विशेष भाग येत्या शनिवार-रविवारी ( १३-१४ सप्टेंबर ) रात्री ९ वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित करण्यात येणार आहे.