Tharala Tar Mag : सध्या संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी सुद्धा लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तिच्या कर्जतच्या घरी गेली आहे.
दरवर्षी जुई शूटिंगमधून ब्रेक घेऊन गणेशोत्सवासाठी कर्जतला आपल्या मूळ घरी जाते. याठिकाणी गडकरी कुटुंबीय एकत्र गणपतीचा सण साजरा करतात. यंदा गणपतीच्या सणाला जुई पूर्णा आजीच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
जुई ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगते, “माझी आजी आणि ज्योती ताई जवळपास सारख्या दिसायला होत्या. त्यामुळे मी सेटवर सतत ज्योती ताईंच्या जवळ असायचे. त्यांचा सहवास, त्यांच्याबरोबर वेळ घालवणं मला खूप आवडायचं. ती सुद्धा माझे भयंकर लाड करायची, माझी काळजी घ्यायची. तिचं असं अचानक जाणं… आमच्या सर्वांसाठी तो खूप मोठा धक्का होता. मी तिला सतत ओरडायचे हे नाही खायचं, ते नाही खायचं… आता ती जिथे कुठे असेल मी इतकंच म्हणेन, ज्योती ताई आता तरी आराम कर, सुखी राहा आणि आता तू हवं ते खाऊ शकतेस.”
जुई पुढे म्हणाली, “आमची पूर्णा आजी खूप थकायची. तिला सतत बरं नसायचं. पाय सुजलेले असायचे…तिने मालिकेचं सगळं शूटिंग आनंदात केलं आणि पुण्याला जायला निघाली. जाताना मला म्हणाली होती की, येते…५ दिवसांत परत येईन. आम्हाला कोणालाच असं वाटलं नव्हतं की, आजी यावेळेला जी गेलीय ती परत कधीच येणार नाही. आमच्या सर्वांसाठी हा खूप मोठा धक्का होता.”
“आजही आमच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या रिडिंग रूममध्ये तिच्या खुर्चीवर कोणीही बसत नाही. तिची खुर्ची तशीच आहे…आम्हाला रोज असं वाटतं की ही आपल्या आजीची रूम आहे. तिची मेकअप रूम होती त्याला आम्ही सगळे आजीची रूम म्हणतो. आता परवा आम्ही तिच्या नावाची एक सदाफुली लावली. फ्रेममध्ये का होईना…ती सतत आमच्याबरोबर आहे. तिला कधीच विसरता येणार नाहीये. असं काही घडल्यास मालिकेत रिप्लेसमेंट होतात…पण, आम्ही कसलाच विचार केलेला नाही. कारण, पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी आम्ही कोणा दुसऱ्याचा विचार करू शकत नाही. मग प्रेक्षक तरी पूर्णा आजीच्या भूमिकेत दुसऱ्या कोणाला कसे पाहतील. ती जिथे कुठे असेल तिला शांतता मिळो.” असं सांगत जुईने आपल्या भावना व्यक्त केल्या.