Tharala Tar Mag : जुई गडकरीची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ मालिका कायमच चर्चेत असते. सध्या या मालिकेत अर्जुन सायलीच्या खऱ्या आई-बाबांचा शोध घेत असल्याचा सीक्वेन्स पाहायला मिळत आहे. या मालिकेची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रत्येक भागात काय होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात असते.
‘ठरलं तर मग’ मालिका गेली अडीच वर्षे टीआरपीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवत आहे. त्यामुळे मालिकेत नवीन काय घडणार? मालिकेमध्ये येणारा पुढचा ट्विस्ट काय असेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या सोशल मीडियावर ‘ठरलं तर मग’ मालिकेचे असंख्य फॅन पेजेस सक्रिय आहेत. ही मालिका रोज रात्री ८:३० वाजता टेलिव्हिजनवर प्रसारित केली जाते. पण, मालिकेचे भाग टीव्हीवर टेलिकास्ट होण्यापूर्वी काही फॅनपेजेसवर प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहे. ही गोष्ट जुई गडकरीच्या लक्षात येताच तिने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत “कृपया असं करू नका” असं आवाहन चाहत्यांना केलं आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी सायलीची भूमिका साकारत आहे. तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या एपिसोडची झलक आणि संपूर्ण मालिका पाहण्यासाठी लिंक जॉइन करा असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
ही पोस्ट शेअर करत सायली म्हणते, “कृपया ही विनंती समजा किंवा चेतावणी समजा…पण, अशाप्रकारे मालिकेचे एपिसोड टेलिव्हिजनवर टेलिकास्ट होण्याआधी शेअर करू नका. कृपया असं करू नका…आपण काही नियमांचं पालन करुयात.”

‘ठरलं तर मग’ मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पण, मालिका सगळ्यांनी टेलिव्हिजनवर रात्री ८:३० वाजता पाहावी असं जुईने तिच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. याशिवाय प्रेक्षक ही मालिका जिओहॉटस्टारवर सुद्धा पाहू शकतात. मात्र, अशाप्रकारे मालिकेचे एपिसोड व्हायरल करणं चुकीचं आणि पूर्ण एपिसोड टेलिकास्ट होण्याआधी सर्वत्र शेअर करणं हे नियमात बसत नाही अभिनेत्रीने म्हटलं आहे.