Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आल्यापासून कल्पनाने सुनेशी अबोला धरल्याचं पाहायला मिळालं. कोर्टात प्रियाचा खोटेपणा उघड झाल्यावर पूर्णा आजीने सुद्धा सायलीला माफ केलं होतं. पण, कल्पनाचा सायलीवरचा राग कायम होता. आता काहीही झालं तरी या सासू-सुनेला एकत्र आणायचं असा निश्चय अस्मिता, अर्जुन आणि प्रताप यांनी केलेला असतो. यामुळे हे तिघे मिळून एक प्लॅन बनवतात.

कल्पना सायलीशी जरी बोलत नसली, तरी आपली सून किती चांगली आहे हे तिला मनोमन माहीत असतं. म्हणूनच अस्मिता आणि प्रताप मुद्दाम कल्पनासमोर सायलीशी तिरसट वागू लागतात. आता लवकरच सुभेदारांच्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे. यावेळी घरातील सगळे सदस्य एकत्र जमतात. अगदी किल्लेदार कुटुंबीय सुद्धा या शुभप्रसंगी उपस्थित असतात.

सुभेदारांच्या घरातील सगळेजण मनोभावे बाप्पाची प्रार्थना करत असताना अस्मिता मुद्दाम सायलीला म्हणते, “काय गं… कोणत्या हक्काने देवाच्या पाया पडत आहेस?” इतक्यात मागून कल्पना येते आणि म्हणते, “मोठ्या सुनेच्या हक्काने ती आज पाया पडतेय…आणि फक्त पायाच पडणार नाहीतर ते दोघं जोडीने बाप्पाची पूजा सुद्धा करणार आहेत.”

कल्पनाने सायलीचा सून म्हणून स्वीकार केला हे समजताच सगळेच आनंदी होतात. प्रतिमाचे डोळे सुद्धा पाणावतात. फक्त एकट्या अश्विनला ही गोष्ट खटकते. बाप्पाची प्रार्थना करताना अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, “बाप्पा सायलीला या आईचं प्रेम पुन्हा एकदा मिळालं आहे. आता तिचे जन्मदाते आई-वडील सुद्धा तिला पुन्हा भेटले पाहिजेत.”

यानंतर अर्जुन सायलीचा भूतकाळ शोधण्यासाठी बाहेर पडतो. आश्रमातील प्रत्येकाकडे बालपणीचं गाठोडं असतं, त्यात लहानपणीच्या वस्तू, फोटो आणि अन्य आठवणी असतात. फक्त आश्रमातील दोन गाठोडी जागेवर नसतात एक प्रियाचं आणि दुसरं सायलीचं… बरोबर या दोघींची गाठोडी गायब असल्याने अर्जुनच्या मनात संशय निर्माण होतो. खरंतर, खऱ्या तन्वीचं सत्य लपवण्यासाठी ही दोन्ही गाठोडी प्रियाने लपवलेली असतात.

आता अर्जुनसमोर हे सत्य उघड झाल्याने तो काय निर्णय घेणार? अर्जुन बायकोच्या भूतकाळापर्यंत पोहोचू शकेल का? हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग प्रेक्षकांना २ ते ४ सप्टेंबर या दरम्यान रात्री ८:३० वाजता पाहायला मिळणार आहे.