Tharala Tar Mag : मराठी मालिका आणि वास्तव जग यांचा संबंध दिवसेंदिवस संपुष्टात येत असल्याचं चित्र आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेची सुरुवात अर्जुन आणि सायली यांच्या तडजोडीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसह झाली होती. हळूहळू या करार लग्नाचं रुपांतर हळूवार प्रेमकहाणीत झालं. गेल्या काही महिन्यांपासून मात्र कोर्टरुम ड्रामा हाच या मालिकेचा केंद्रबिंदू झाला आहे. काही दिवसांपूर्वी कथानकात खुनाचा आरोप असलेली मंडळी पत्रकार परिषद घेतात. या परिषदेला चुकीचं स्पेलिंग असलेला फलक, त्याचा अतरंगी रंग आणि मध्येच उभा केलेला कॅमेऱ्याचा ट्रायपॉड यामुळे मालिका लेखकांनी कधीच खरीखुरी पत्रकार परिषद पाहिलं नसल्याचं स्पष्ट झालं.
सर्वसाधारणपणे पत्रकार परिषद ज्या निमित्तासाठी घेतली जाते त्याचं कारण मागच्या पडद्यावर असतं. एखाद्या कंपनीचा कार्यक्रम असेल तर त्या कंपनीचं नाव असतं. एखादा लॉन्चिंग, अनावरण, प्रकाशनाचा कार्यक्रम असेल तर संबंधित कार्यक्रमाचं नाव, माणसं यांची नावं असतात. फोटोही असतात. मालिकेत खुनाचा आरोप असलेली मंडळी पत्रकार परिषद घेतात. वकील, महिपत सगळे बोलत असताना मागे मोठ्या अक्षरात पत्रकार परिषद असं इंग्रजीत लिहिलेलं असतं. मुळातच कोणत्याही पत्रकार परिषदेत इतक्या मोठ्या अक्षरात पत्रकार परिषद लिहिलं जात नाही. या फलकाचा निळा रंगही सहसा पत्रकार परिषदेत नसतो. पत्रकार परिषदेचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी कॅमेरामन मंडळी मागच्या बाजूस असतात. ट्रायपॉडवर कॅमेरे लावून ते सज्ज असतात. मालिकेतल्या पत्रकार परिषदेत बोलणारी माणसं आणि समोरची मंडळी यामध्ये एक कॅमेरा दिसतो. हा कॅमेरा मध्येच कसा असेल असा प्रश्न मालिकाकर्त्यांना पडला नाही. कारण वास्तव जगातली पत्रकार परिषद कशी असते याची त्यांना कल्पनाच नाही. मालिकेच्या याच पत्रकार परिषदेतील एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेत हा पत्रकार परिषदेचा भाग १९ जुलैला प्रसारित करण्यात आला होता. या सीनमध्ये मालिकेच्या टीमकडून एक मोठी चूक झाली आहे आणि ती प्रेक्षकांनी अचूक हेरली आहे. आता मालिका किंवा सिनेमा म्हटलं की, डोकं बाजूला ठेऊन पाहाव्यात असं म्हटलं जातं. पण, ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या १९ जुलैच्या भागात चक्क प्रेस कॉन्फरन्स घेताना त्याच शब्दाचं इंग्रजी स्पेलिंग चुकवण्यात आलं आहे.
मालिकेत पत्रकार परिषदेच्या सीनमध्ये ‘Press Conference’ चं स्पेलिंग चुकवून ‘Conferance’ असं लिहिण्यात आलं आहे. याशिवाय कोणतीही पत्रकार परिषद घेताना अशाप्रकारे मागे बोर्ड लावला जात नाही. या चुका प्रेक्षकांनी अचूक हेरल्या आहेत. सध्या या सीनदरम्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हायरल पोस्टवरच्या प्रेक्षकांच्या कमेंट्स
“१ कॅमेरा ८ बूम”, “काल चुकून टीव्हीवर हेच पाहिलं म्हटलं जग केवढं पुढे गेलंय…प्रेस कॉन्फरन्स लिहावं लागतं हल्ली”, “स्पेलिंगही चुकवलं” या सीनबाबत अशा असंख्य प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर येत आहेत.

खरंतर, सध्या छोट्या पडद्यावर टीआरपीसाठी मोठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, अतिरंजित भाग दाखवण्यासाठी क्षुल्लक चुका करणं कितपत योग्य आहे हा एक प्रश्नच आहे. सोशल मीडियावरही या प्रसंगाची सध्या विशेष चर्चा रंगली आहे.