‘ठरलं तर मग’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्टला निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली होती. यासह मालिकेतील त्यांच्या सहकलाकारांनी सुद्धा भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना अखेरचा निरोप दिल्याचं पाहायला मिळालं. पूर्णा आजीला आम्ही कधीच विसरू शकत नाही अशा भावना जुई गडकरी, अमित भानुशाली, मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

‘ठरलं तर मग’ मालिकेत अस्मिताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिकाची ती गरोदर असताना ज्योती चांदेकरांनी खूप काळजी घेतली होती. मोनिकाला मार्च महिन्यात मुलगी झाली, यानंतर बालसंगोपन, प्रेग्नन्सीमध्ये घ्यायची काळजी अशा बऱ्याच गोष्टी पूर्णा आजीने मला सांगितल्या असं मोनिकाने तिने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

मोनिका म्हणते, “आज मी पूर्णा आजीला जसे आवडायचे तसे मुगाचे अप्पे बनवले होते. गेल्या काही दिवसांपासून माझं कशातच मन लागत नव्हतं…याचं कारण सर्वांनाच माहीत आहे. आता खूप दिवसांनी व्हिडीओ सीरिज पुन्हा शेअर करण्यास मी सुरुवात केली आहे. आता काय बनवायचं हा प्रश्न समोर होता म्हणूनच, मी पूर्णा आजीने मला प्रेग्नन्सीमध्ये जसे मुगाचे अप्पे खाऊ घातले होते…तेच अप्पे बनवायचा निर्णय घेतला. त्याची रेसिपी मी तुम्हा सर्वांबरोबर शेअर करतेय.”

“रात्रभर मूग भिजवून ठेवले होते. या मुगामध्ये मिरची, आलं-लसूण आणि थोडासा रवा घालायचा. हे सगळं मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं. त्यानंतर या मिश्रणात मीठ, जिरे आणि थोडंसं पाणी घातलं, त्यानंतर हे सगळं परत वाटून घेतलं. अप्पे बनवायचा तवा घ्यायचा, ते बॅटर तव्यात तेल घालून वरून घालायचं. यात तुम्ही थोडा इनो किंवा बेकिंग सोडा टाकू शकता. मी असं काही घातलं नव्हतं तरीही अप्पे एकदम चविष्ट झाले होते.”

“मला पूर्णा आजी हे अप्पे चटणीबरोबर खायला द्यायची पण, आज मी केचअपबरोबर खातेय. अस्मिता आणि पूर्णा आजी…असे बरेच सीन आम्ही एकत्र केले. खूप मजा केली, एकत्र गमतीजमती केल्या. तिने वृंदाला कसं मोठं कर याच्याही टिप्स मला दिल्या होत्या. पूर्णा आजी हे सगळं करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. लव्ह यू आणि मिस यू.” असं सांगत मोनिकाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.