Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच प्रतिमा आणि रविराज किल्लेदार आश्रमात गेल्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी प्रतिमा आश्रमातील किचनच्या भिंतीवर रेखाटलेलं एक चित्र पाहते आणि हे चित्र आपल्या तन्वीने काढलंय असं रविराजला सांगते. नेमकी हीच गोष्ट मधुभाऊ पाहतात. यानंतर जुन्या आठवणी, मुलांच्या वह्या तपासताना त्यांच्या लक्षात येतं की, प्रतिमाने दाखवलेलं चित्र प्रियाने नाहीतर सायलीने काढलंय. म्हणजे सायलीच खरी तन्वी आहे अशी शंका त्यांच्या मनात निर्माण होते.

आता काही करून आपल्या मानलेल्या लेकीचे खरे आई-बाबा कोण आहेत याचा शोध घ्यायचा असा निश्चय मधुभाऊ करतात. सुरुवातीला मधुभाऊ पूर्णा आजीकडे किल्लेदारांच्या अपघाताविषयी चौकशी करतात. यानंतर हळुहळू सायलीच खरी तन्वी आहे यावर त्यांचा विश्वास होतो. शेवटी हातात एक ठोस पुरावा हवा यासाठी मधुभाऊ प्रतिमा आणि तन्वीचा बालपणीचा फोटो कुठे असेल याचा शोध घेण्यासाठी सुभेदारांच्या घरी जातात.

सुभेदारांकडे दहीहंडीचा उत्सव सुरू असतो. त्यामुळे, सायली-अर्जुन कुटुंबीयांबरोबर आनंदाने सण साजरा करत असतात. तर, मधुभाऊ सुभेदारांच्या घरात लेकीच्या भूतकाळाचा शोध घेत असतात. इतक्यात त्यांच्या हाती लागते प्रतिमा आणि तन्वीची बालपणीची फोटोफ्रेम…बालपणीच्या तन्वीला पाहून मधुभाऊंच्या पायाखालची जमीन सरकते. कारण, त्यांचा संशय खरा ठरतो. सायली हीच खरी तन्वी किल्लेदार असते. आता हे सत्य सर्वांना जाऊन सांगायचं, प्रियाने खूप मोठा घात केलाय. या विचारात मधुभाऊ असतात. पण, इथेच एक मोठा ट्विस्ट आहे.

मधुभाऊ शोधाशोध करत असताना पूर्णवेळ नागराज त्यांच्या मागावर असतो. मधुभाऊंना सायलीचा खरा भूतकाळ समजला, तिची ओळखही पटली हे जेव्हा नागराजला समजतं तेव्हा, तो कोणताही विचार न करता मधुभाऊंवर हल्ला करतो. त्यांच्यावर वार करतो, सध्या महासंगम सुरू असल्याने सायली-अर्जुनच्या घरी आलेल्या अद्वैतवर सुद्धा हल्ला होतो.

अद्वैत कसाबसा बाहेर येतो आणि अर्जुनला आवाज देतो. सायलीच्या खऱ्या आई-बाबांचं सत्य समजलंय, इतकंच तो अर्जुनला सांगतो. अर्जुन लगेच मधुभाऊंच्या दिशेने धाव घेतो. आता येत्या भागात सुभेदार कुटुंबीय मधुभाऊंना रुग्णालयात दाखल करणार असल्याचं पाहायला मिळेल. मधुभाऊंवर हल्ला झाल्याचं पाहताच सायली प्रचंड खचते, तिला अश्रू अनावर होतात. मात्र, आता सायली शांत बसणार नाहीये.

बाबांवर हल्ला झाल्यावर लेक रणरागिणीचा अवतार घेऊन थेट महिपतकडे पोहोचते. ती त्याला थेट म्हणते, “माझे मधुभाऊ तुझ्यामुळे कोमात गेले आहेत महिपत… अरे नव्याने आयुष्य सुरू करणार होते ते पण, तू सगळं त्यांच्यापासून हिरावून घेतलं. अजून किती जणांचा तळतळाट घेशील. तुझी मुलगी शिक्षा भोगतेय हे पुरेसं नाहीये का?” सायलीचं बोलणं महिपतला सहन होत नाही. तो सायलीवर हात उचलणार इतक्यात अर्जुन महिपतचा थेट गळा दाबतो.

दरम्यान, आता मधुभाऊ कोमातून केव्हा बाहेर येणार? ते हल्ल्यातून सुखरूप बरे होतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बरे झाल्यावर त्यांना जुनं काही आठवेल का? की त्यांचीही वाचा जाणार याचा उलगडा मालिकेच्या आगामी भागात होईल.