Tharala Tar Mag Updates : ‘ठरलं तर मग’मध्ये वात्सल्य आश्रम केसचा अंतिम निकाल मालिकेत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. केसचा तिढा सोडवण्यासाठी अर्जुनला मिळालेली ही शेवटची संधी असते. कोर्टात साक्षी विरोधात मोठा पुरावा सादर करण्यासाठी प्रियालाच साक्षीने केलेल्या गुन्ह्याची कबुली द्यावी लागेल, याची जाणीव अर्जुनला आधीपासून असते. त्यामुळे शेवटच्या दिवशी अर्जुन सर्वांसमोर प्रियाची उलट तपासणी करणार आहे.
अर्जुन सुरुवातीला साक्षी आणि प्रियाला एकमेकींच्या समोरासमोर एकत्र साक्ष देण्यासाठी उभं करतो. यावेळी दोघींमध्ये सिनेमाच्या तिकिटांच्या पैशांवरून वाद होतात. साक्षी प्रियाची अक्षरश: लायकी काढते. यामुळे सुभेदार कुटुंबीयांना देखील धक्का बसतो. आता हळुहळू प्रियाची दुसरी बाजू रविराज किल्लेदार, सुमन आणि सुभेदार कुटुंबीयांसमोर उघड होऊ लागली आहे.
अर्जुन यानंतर एक मोठा डाव खेळणार आहे. भर कोर्टात तो प्रियाला गोंधळवून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्जुन कोर्टात सांगतो, “प्रिया यांनी फक्त विलास नाहीतर मधुभाऊंना देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. विलासचं पिस्तुल तुझ्या हातात होतं…प्रिया तूच विलासवर गोळी झाडली आहेस…तूच त्याला मारलं आहेस, तुलाच विलासचा खून घडवून आणायचा होता, तुला फक्त पैसे हवे होते आणि म्हणून तू विलासचा खून केलास. त्याच्यावर गोळी झाडलीयेस हो ना….”
अर्जुनचे एकावर एक गंभीर आरोप ऐकून प्रियाचा ताबा सुटतो. ती कोर्टात रडू लागते, जोरजोरात ओरडून म्हणते, “नाही नाही नाही… मी गोळी झाडली नाहीये…गोळी साक्षीने झाडलीये. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय.”
प्रिया अखेर सर्वांसमोर साक्षीने केलेला गुन्हा कबूल करणार आहे. गोळी साक्षीने झाडलीये ही प्रियाने दिलेली कबुली ऐकताच महिपत-दामिनीच्या पायाखालची जमीन सरकते. साक्षीच्या चेहऱ्यावर आता आपल्याला अटक होणार म्हणून बारा वाजलेले असतात. तर, दुसरीकडे मधुभाऊ सुटणार याचा आनंद सायलीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो.
दरम्यान, आता भर कोर्टात प्रियाने साक्षीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्यावर आता केसचा अंतिम निकाल अर्जुनच्या बाजूने लागणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. मात्र, या सगळ्यात प्रिया अडकणार नाहीये. तिचा खोटेपणा कोणासमोरही उघड होणार नाहीये. शिक्षा केवळ साक्षी शिखरेलाच होईल असा अंदाज प्रेक्षकांनी बांधला आहे. आता मालिकेच्या आगामी भागात कोणकोणते ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.