Tharala Tar Mag Fame Soham Bandekar : मराठी कलाविश्वाचे ‘होम मिनिस्टर’ आणि मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून आदेश व सुचित्रा बांदेकर यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं नाव आहे सोहम बांदेकर. ‘स्टार प्रवाह’च्या ‘नवे लक्ष्य’ मालिकेतून त्या कलाविश्वात पदार्पण केलं होतं. मात्र, आता सोहम आणखी एक जबाबदारी यशस्वीरित्या पार पडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सोहम बांदेकर ‘स्टार प्रवाह’च्या ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन आघाडीच्या मालिकांचा निर्माता आहे. त्याच्या दोन्ही मालिकांच्या सेटवर तो स्वत: उपस्थित असतो. याशिवाय सोहम सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असतो. त्याने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी सोहमला त्याच्या चाहत्यांनी हटके प्रश्न विचारले होते. या सगळ्या प्रश्नांची सोहमने अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली.
एका युजरने त्याला विचारलं, “एक निर्माता म्हणून मालिकेची कथा ठरवण्यासाठी तुझं कसं योगदान असतं?” यावर सोहम म्हणाला, “मी नेहमीच जास्तीत जास्त चांगलं काय सुचवता येईल यासाठी प्रयत्न करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी दिलेल्या सूचना त्यांच्याकडून ग्राह्य धरल्या जातात, याचा मला विशेष आनंद आहे.”

सध्या मालिकाविश्वात ‘महासंगम’ ही नवीन संकल्पना सुरू झालेली आहे. या ‘महासंगम’ विशेष भागांमध्ये दोन किंवा तीन मालिकांची कथा एकत्र करून दाखवली जाते. याचं उदाहरण सांगायचं झालं, तर ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांचा महासंगम दाखवताना जानकीचा जन्म मधुभाऊंच्या अनाथ आश्रमात झाला होता यामुळे सायली आणि तिची आधीपासून ओळख आहे असं दाखवण्यात आलं होतं.
यावरूनच सोहमला एक नेटकरी विचारतो, “मालिकांमध्ये येणारे महासंगम कधी संपणार?” यावर सोहम मिश्किलपणे उत्तर देत म्हणाला, “Never…ते कधीच संपणार नाहीत. कायम माझ्याबरोबर राहतील.”

दरम्यान, सोहमचे चाहते आता लवकरच त्याला नवनवीन प्रोजेक्ट्समध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता सोहम अभिनेता म्हणून पुन्हा कोणत्या मालिकेत किंवा चित्रपटात झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.