Tharala Tar Mag Actress Jyoti Chandekar Passed Away : ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट रोजी निधन झालं. वृद्धापकाळातील अल्पशा आजाराने त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांची मुलगी व प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितने शोक व्यक्त करत दिली. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. लाडक्या ‘पूर्णा आजी’ला अखेरचा निरोप देण्यासाठी मालिका आणि सिनेविश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते.

ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी भावनिक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. सुचित्रा बांदेकर म्हणतात, “ज्योती ताई की पूर्णा आजी काय म्हणू तुम्हाला… मला तुम्ही नेहमीच मायेनं भेटलात… सेटवरचं हसरं व्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्ही आणि तरुण व्यक्तिमत्त्व सुद्धा तुम्हीच… १० तारखेला मला म्हणालात ५ दिवसांत पुण्याला जाऊन मी परत येते. नेहमी शब्द पाळणाऱ्या यावेळी शब्द पाळला नाहीत. खूप प्रेम ताई!”

सोहम बांदेकरची भावुक पोस्ट

पूर्णा आजी,
मी तुला आजी प्रेमाने म्हणायचो, पण तू आजीसारखी कधीच दिसली नाहीस, गेली ३ वर्षे आपण सेटवर भेटायचो, गप्पा मारायचो तेव्हा जाणीव व्हायची की, ही आजी नसून एक मैत्रीण आहे, खूप पॉझिटिव्ह आणि फॉरवर्ड थिंकिंग तरुणी माझ्या माहितीतली तूच, खूप शिकलो, तुझा क्लोज बघायला थांबायचो. तुझ्याकडून काम शिकायचं राहूनच गेलं. पण, तुझ्यासारखं बिनधास्त आणि सकारात्मक जगायला नक्की शिकेन…ठरलं तर मग!

आदेश बांदेकरांनीही व्यक्त केला शोक

‘ठरलं तर मग’च्या सेटवरच्या तुमच्या गप्पा नेहमी सोहमकडून ऐकायचो. आजी आणि नातू हे आपुलकीच नातं आणि तुम्हा दोघांचा जिव्हाळ्याचा संवाद म्हणजे सोहमला आणि सोहम प्रोडक्शन्सला मिळालेला आशीर्वाद आहे जो कायम स्मरणात राहील! ज्योती ताई या आपल्या कुटुंबाला सदैव तुमची उणीव भासत राहील.

दरम्यान, ज्योती चांदेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या कलाकृतींमध्ये काम केलं आहे. गेल्या अडीच वर्षांपासून त्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. त्यांच्या या भूमिकेला घराघरांत प्रचंड प्रेम मिळालं. त्यांच्या निधनानंतर मालिकेच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.