Tharala Tar Mag Purna Aaji : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा चालू आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून मालिकेत दिवंगत अभिनेत्री ज्योती चांदेकर ‘पूर्णा आजी’ ही भूमिका साकारत होत्या. १६ ऑगस्टला आजारपणामुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला होता. यानंतर आजींची भूमिका आता कोण साकारणार याबद्दल चर्चा होऊ लागल्या.
अनेकांनी या भूमिकेसाठी कोणाचीही रिप्लेसमेंट करू नका असाही सल्ला निर्मात्यांना दिल्या. मात्र, लवकरच पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी एका नव्या अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री होणार असल्याची शक्यता आहे. मध्यंतरी मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी कथानकाची गरज पाहून निर्णय घ्यावा लागेल. सध्या आम्ही दु:खातून सावरलेलो नाही आहोत अशी प्रतिक्रिया मुलाखतीत दिली होती.
आता सोशल मीडियावर पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट म्हणून काही ज्येष्ठ अभिनेत्रींच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका एका अभिनेत्रीने सोडल्यामुळे त्यांच्याच नावची चर्चा पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी होत आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेत येत्या काळात ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस पूर्णा आजीच्या भूमिकेत झळकतील असा अंदाज वर्तवला जात आहे. सोशल मीडियावर तशा पोस्टही व्हायरल झाल्या आहेत. स्वाती चिटणीस या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत अर्णवच्या आजीची भूमिका साकारत होत्या. मात्र, नुकतीच त्यांनी ‘तू ही रे माझा मितवा’मधून एक्झिट घेतली आहे. त्यामुळे स्वाती चिटणीसच पूर्णा आजी साकारणार असा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे.
यावर ‘स्टार प्रवाह’ वाहिनी किंवा ‘ठरलं तर मग’च्या टीमने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. जुईने मध्यंतरी इन्स्टाग्राम ‘आस्क मी सेशन’मध्ये चॅनेल अधिकृतपणे निर्णय घेईल त्यावेळीच पूर्णा आजीच्या रिप्लेसमेंटची माहिती तुम्हाला दिली जाईल असं स्पष्ट केलं होतं.

त्यामुळे वाहिनी यावर काय निर्णय घेणार? पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी कोणाची वर्णी लागणार? की या पात्रासाठी चॅनेल कोणाचीच निवड करणार नाही? या गोष्टी येत्या काही दिवसांत स्पष्ट होतील. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन जुई गडकरीने चाहत्यांना केलं आहे.