Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सुभेदारांच्या घरी श्रावणातील पूजेचा कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रियाला अटक झाल्याने इथून पुढे फक्त सकारात्मक विचार करायचा या दृष्टीकोनातून पूर्णा आजी व सायलीने घरी पूजा करण्याचा निर्णय घेतला होता.

पूजेदरम्यान आरती करताना सुभेदारांच्या घरातील खिडकीवर अचानक काहीजण दगडफेक करून पळून जातात. पण, या दगडांवर एक कागद गुंडाळलेला सायलीला दिसतो. यामध्ये अर्जुनला जीवे मारण्याची धमकी दिलेली असते. त्यामुळे सायली प्रचंड घाबरते. आता इथून पुढे नवऱ्यावर २४ तास लक्ष ठेवायचं असा निर्णय सायली घेते.

सुभेदारांच्या घरी पूजा पार पडल्यावर पूर्णा आजी आणि कल्पना यांना सायलीशी आपण खूप वाईट वागलो याची खंत वाटत असते. माणसं ओळखण्यात चूक केली आपण उगाच प्रियाची बाजू घेतली याची जाणीव पूर्णा आजीला होते. तिचे डोळे पाणावतात, यावेळी सायलीचा हात हातात घेऊन पूर्णा आजी तिची मोठ्या मनाने माफी मागते.

पूर्णा आजी, कल्पना या दोघीजणी आपली माफी मागत असल्याचं पाहून सायलीचं मन भरून येतं. यादरम्यान, पूर्णा आजी आणखी एक मोठा निर्णय घेते. तिने संपूर्ण घराची जबाबदारी पुन्हा एकदा सायलीवर सोपवली आहे. पूर्णा आजी सायलीच्या हातात घराच्या किल्ल्या देते. आम्ही तुला या घरापासून दूर करत होतो पण, आता मला कळून चुकलंय की, तूच हे घर खूप चांगलं सांभाळू शकतेस अशी कबुली यावेळी पूर्णा आजी आणि कल्पना देतात.

आपल्या सासवांचा आपल्यावर असलेला विश्वास पासून सायली देखील भावुक होते. ती पूर्णा आजीला मिठी मारते. यानंतर सायली एवढी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर दिलीये याचं दडपण आल्याचं अर्जुनला सांगते. पण, अर्जुनला त्याच्या बायकोवर पूर्ण विश्वास असतो.

मालिकेत अश्विन वगळता अन्य सुभेदार कुटुंबीय आता एकत्र झाले आहेत. पण, अर्जुनला धमकी मिळाल्याने सायली अस्वस्थ असते. सकाळी अर्जुन ऑफिसला जाऊ नये यासाठी ती सुरुवातीला त्याला रूममध्ये कोंडून ठेवते. “आता जिथे मी असेन तिथेच तुम्ही जायचं” असं ती नवऱ्याला सांगते.

पण, अर्जुनला ऑफिसला जाणं भाग असतं. आता उद्याच्या भागात अर्जुन चैतन्य घरी आल्यावर ऑफिसला गेल्याचं पाहायला मिळेल. आता सायली इथून पुढे नवऱ्याचं रक्षण कसं करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जेलमध्ये साक्षी-प्रियामध्ये हाणामारी

जेलमध्ये साक्षी आणि प्रियाला एकाच कोठडीत ठेवलेलं आहे. या दोघींमध्ये बराच वाद होतो यावेळी साक्षी प्रियाला कानाखाली मारते आणि तिची खरी ओळख तन्वी सुभेदार नसून वेगळीच आहे हे मी सर्वांना सांगेन अशी धमकी देते. पण, प्रिया अजिबात शांत बसत नाही ती सुद्धा साक्षीला कानशिलात लगावते, दूर ढकलते आणि तुझ्या बापाचे काळे धंदे मी जगासमोर आणेन अशी धमकी देते. शेवटी दोघेही शांत होतात कारण, त्यांच्याकडे तिथून बाहेर पडण्याचा काहीच पर्याय सध्या नाहीये.

दरम्यान, आता येत्या आठवड्यात प्रतिमा आश्रमात गेल्याने खरी तन्वी दुसरी-तिसरी कोणी नसून सायलीच आहे अशी शंका मधुभाऊंच्या मनात निर्माण होणार आहे. त्यामुळे आगामी भाग पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत.