Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत जवळपास अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वात्सल्य आश्रमाच्या केसचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता प्रिया आणि साक्षीची रवानगी जेलमध्ये करण्यात आलेली आहे. पण, याचा सगळ्यात मोठा धक्का किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबीयांना बसला आहे.
पूर्णा आजीचा सुरुवातीपासून प्रियावर खूप जीव असतो. कारण, प्रियाने तिच खरी तन्वी असल्याचं नाटक सर्वांसमोर केलेलं असतं. अश्विनचं लग्न आपण प्रियासारख्या कारस्थानी मुलीशी लावलं हा सगळा विचार करून पूर्णा आजीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती चक्कर येऊन पडते. यामुळे सगळेजण तिची काळजी करतात. अश्विन सुद्धा घरात नसतो, त्यामुळे लगेच डॉक्टरांना बोलावून घेतलं जातं.
अश्विन बायकोच्या प्रेमात इतका वेडा झालेला असतो की, त्याला तिच्या चुकाही दिसत नसतात. तो अर्जुन-सायलीला प्रियाच्या अटकेबाबत जाब विचारतो. सायलीने मुद्दाम प्रियाला या सगळ्यात अडकवलंय असा समज अश्विनने करून घेतलेला असतो. प्रियावर आंधळा विश्वास ठेवून अश्विन लगेच तिला भेटण्यासाठी जेलमध्ये जायला निघतो.
जेलमध्ये प्रिया आणि साक्षीला एकाच कोठडीत ठेवलेलं असतं. दोघींचे इथेही वाद होतात. कोर्टात तू ऐनवेळी खरं का बोललीस याबद्दल साक्षी प्रियाला जाब विचारते. यानंतर दोघींमध्ये टोकाची भांडणं सुरू होतात आणि तेवढ्यात अश्विन तिथे पोहोचतो.
प्रिया अश्विनला पाहताच लगेच कमीपणा घेते आणि रडण्याचं नाटक करू लागते. मला जेलमध्ये का टाकलंय, माझी काहीच चूक नाहीये अशी सगळी नाटकं प्रिया नवऱ्यासमोर करू लागते. साक्षी तिची सगळी नाटकं पाहत असते. अश्विनला सुद्धा तिच्या प्रियाच्या खोट्या अश्रूंवर विश्वास बसतो आणि तुझी मी लवकरात लवकर या सगळ्यातून सुटका करेन असं तो तिला सांगतो.
यानंतर जेलमध्ये पोहोचतो साक्षीचा बाबा महिपत. आपले अन्ना आपल्याला भेटायला आल्याचं पाहताच साक्षीला अश्रू अनावर होतात. लेकीची अवस्था पाहून महिपत रागाने प्रियाचा गळा धरतो. तिने साक्षी शिखरेच्या विरोधात साक्ष का दिली याचा जाब तो तिला विचारतो. महिपत-साक्षी आणि प्रिया यांच्यात जेलमध्येच वाद होतात.
रविराज किल्लेदार घेणार मोठा निर्णय
एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे रविराज किल्लेदार मोठा निर्णय घेणार आहेत. त्यांनी प्रियाची केस अधिकृतपणे सोडलेली आहे. यापुढे रविराज किल्लेदार प्रियाची केस लढणार नाहीयेत. हा निर्णय ऐकून नागराजला खूप मोठा धक्का बसतो. कारण, रविराजने केसमधून काढता पाय घेतल्यावर प्रियाचं जेलच्या बाहेर येणं फार कठीण आहे याची जाणीव नागराजला असते.
दरम्यान, आता प्रिया जेलमधून बाहेर की नाही? अश्विन तिला सोडवण्यासाठी काय-काय प्रयत्न करणार हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.