Tharala Tar Mag 28 to 30 July Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत लवकरच वात्सल्य आश्रमाच्या विलास खून खटल्यासंदर्भातील अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते ते सत्य अखेर सर्वांसमोर उघड होणार आहे. मालिकेत जिवलग मैत्रिणी होऊन वावरणाऱ्या साक्षी आणि प्रिया अंतिम क्षणाला कोर्टात एकमेकींविरोधात उभ्या राहणार आहेत. कोर्टात अंतिम निकाल लागताना प्रेक्षकांना नेमका कोणता ड्रामा पाहायला मिळेल जाणून घेऊयात…
‘ठरलं तर मग’ मालिकेत आश्रम केसचा निकाल लागण्यासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. अशातच अर्जुनला प्रियासंदर्भातील एक मोठी हिंट मिळाली आहे. प्रियाला कोर्टात आपली इमेज जपायची असते… कारण, तिने साक्षीच्या नादाला लागून खोटी साक्ष दिलीये हे उघड झालं तर रविराज किल्लेदार तिला कायमच दूर करतील आणि सुभेदार कुटुंबीयांच्या नजरेत सुद्धा ती खाली पडले याची पुरेपूर जाणीव प्रियाला असते.
अर्जुनला प्रियाचा हा दुहेरी डाव आता कळून चुकला आहे आणि याच गोष्टीचा वापर करून तो साक्षी-प्रियामध्ये भांडणं लावून देणार आहे. मालिकेत दोन वर्षांपासून सख्ख्या मैत्रिणी होऊन फिरणाऱ्या साक्षी-प्रिया केसचा अंतिम निकाल लागताना पक्क्या वैरी होणार आहेत आणि एकमेकींवर गंभीर आरोप करताना दिसतील.
साक्षी कोर्टात म्हणते, “प्रिया गेली दोन वर्षे सर्वांशी खोटं बोलतेय. खूनाच्या रात्री या प्रियाकडून पैसे मागण्यासाठी मी आश्रमात गेले होते.” साक्षीचा हा सणसणाटी आरोप ऐकून तिला प्रतिउत्तर देण्यासाठी प्रिया म्हणते, “गोळी मी नाही…या साक्षीने झाडलीये… ” सत्य कबूल केल्यावर प्रिया आपसूकच तोंडावर हात मारते.
अर्जुन तिचा खोटेपणा लगेच हेरतो आणि म्हणतो, “हेच खरं सत्य आहे” इतक्यात दामिनी सांगते, “हे खोटं आहे” या सगळ्यात प्रोमोमध्ये सायली भर कोर्टात उभी राहून आपल्या वडिलांची ठामपणे बाजू घेताना दिसतेय. ती म्हणते, “मिस्टर मधुकर पाटील निर्दोष होते आणि आहेत…हे आता तरी मान्य करा मॅडम”
यानंतर न्यायाधीश समोर आलेल्या पुराव्यांवरून अंतिम निकाल जाहीर करणार आहेत. हे विशेष भाग प्रेक्षकांना २८ ते ३० जुलै यादरम्यान पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षक हा जबरदस्त प्रोमो पाहून खूपच खूश झाले आहेत. अखेर दोन वर्षांनी विलास खून खटल्याचं सत्य सर्वांसमोर उघड होणार असल्याने प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये आनंद व्यक्त केला आहे.