Tharala Tar Mag : वात्सल्य आश्रमाच्या केसचा निकाल लागण्यासाठी आता फक्त २१ दिवस उरले आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून प्रेक्षक ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते, तो निकाल अखेर लागणार आहे. अर्जुन मधुभाऊंना निर्दोष मुक्त करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, काहीही झालं तरी दामिनीला अर्जुनला ही केस जिंकू द्यायची नाहीये.

अर्जुन आणि सायली आश्रम केससंदर्भातील पुरावे शोधण्यासाठी महिपत आणि साक्षी शिखरेच्या घरी जातात. एवढंच नव्हे तर, गेल्या काही दिवसात सायली प्रियाच्या हालचालींवर देखील बारीक लक्ष ठेवून असते. मात्र, आता कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार या केसचा निकाल अवघ्या महिन्याभरात लागणार आहे. अर्जुनला सगळे पुरावे शोधून, मधुभाऊंना निर्दोष मुक्त करण्यासाठी फक्त ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. यातील ९ दिवस आता संपले असून केसचा निकाल लागण्यासाठी फक्त २१ दिवस बाकी राहिले आहेत.

आता या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. अर्जुन देवळात गेलेला असताना त्याला काही पत्रकार घेरतात आणि विविध प्रश्न विचारून भंडावून सोडतात. पत्रकार अर्जुनला विचारतात, “आता केससाठी एकच महिना दिलाय, सासरे आहेत म्हणून तुम्ही मधुभाऊंना पाठिशी घालताय का? तुमच्याकडे पुरेसे पुरावे नाहीयेत का? या एका महिन्यात तुम्ही ही केस जिंकाल की हराल?”

अर्जुन पत्रकारांसमोर स्वत:ची बाजू मांडणार इतक्यात मागून सायली येते. ती आपल्या नवऱ्याच्या पाठिशी ठामपणे उभी राहते आणि म्हणते, “आमच्यासाठी हा फक्त १ महिना नाही, ३० दिवस आहेत. ज्यांचा लढा सत्याच्या बाजूने असतो, त्यांना हरण्याची भीती नसते.”

सायलीची प्रतिक्रिया ऐकून सगळेच शांत होतात आणि त्यानंतर सायली अर्जुनला घेऊन गर्दीतून बाजूला होते. कठीण प्रसंगात ती आपल्या नवऱ्याला खंबीर साथ देते. आता निकालाच्या दिवशी कोर्टात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साक्षी शिखरेचे कॉल डिटेल्स अर्जुनच्या हाती…

दरम्यान, केसविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर, सध्या अर्जुनच्या हाती साक्षी शिखरेचे कॉल डिटेल्स लागले आहेत. यामुळे विलासचा खून झाला त्या रात्री साक्षीचं लोकेशन वात्सल्य आश्रमाजवळ असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. आता या पुराव्यामुळे केसला निर्णायक वळण येऊन मधुभाऊंच्या सुटकेचा मार्ग मोकळा होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.