Tharala Tar Mag 1 August Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत बहुप्रतीक्षित वात्सल्य आश्रम केसचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून विलासच्या खुनाची शिक्षा भोगणाऱ्या निष्पाप मधुभाऊंची अखेर सुटका झाली असून, कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवलं आहे. अर्थात या सगळ्याचं श्रेय अर्जुनचं असतं. त्याच्या हुशारीमुळे साक्षी शिखरेला भर कोर्टात तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली द्यावी लागली आणि यानंतर कोर्टाने साक्षी आणि प्रियाला कठोर शिक्षा सुनावली आहे.

विलास खून प्रकरणी कोर्टाने साक्षी शिखरेला जन्मठेपेची आणि प्रिया मधुकरला ७ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा ऐकल्यावर प्रियाची अवस्था फारच बिकट होते. ती सर्वांसमोर ढसाढसा रडून मला या सगळ्यातून वाचवा अशी विनवण्या करत असते. पण, रविराज किल्लेदार देखील तिची मदत करण्यास नकार देतात. यामुळे प्रियासमोर काहीच पर्याय उरत नाही.

प्रिया ७ वर्षांची तुरुंगावासाची शिक्षा ऐकून प्रचंड अस्वस्थ झालेली असते. तिच्या हातात बेड्या घालून पोलीस तिला नेत असतात. याचदरम्यान, कोर्टाबाहेर सुभेदार कुटुंबीय उभे असतात. प्रियाला वाटतं तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून पुन्हा एकदा पूर्णा आजीला दया येईल. पण, घडतं उलटंच…पूर्णा आजी प्रियाला सणसणीत कानाखाली वाजवते आणि म्हणते, “इतक्या भयंकर मुलीचा आमच्या घराशी काहीच संबंध नाहीये घेऊन जा हिला…”

पूर्णा आजीने समजून घेण्यास नकार दिल्यावर प्रिया तिचा मोर्चा सासूबाई कल्पनाकडे वळवते. पण, कल्पना सुद्धा रागाच्या भरात प्रियावर हात उचलते. ती म्हणते, “आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला त्याचं तू हे फळ दिलंस?”

यानंतर त्याठिकाणी सायली येते आणि ती सुद्धा प्रियाला कानशिलात लगावते. पूर्णा आजी, कल्पना, सायली तिघीही तिला कानाखाली मारतात. सायली तिला सांगते, “आता ७ वर्ष जेलमध्ये सडायचं प्रिया…हीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा आहे”

प्रियाचं खरं रुप सर्वांसमोर उघड झाल्यावर प्रत्येकाला धक्का बसतो. नेहमी प्रियाची बाजू घेणारी अस्मिता सुद्धा धक्क्यात असते, ती देखील प्रियाचा तिरस्कार करू लागते. आता प्रियाने केलेले गुन्हे जेव्हा प्रतिमा आणि अश्विनला कळतील तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग १ ऑगस्टला रात्री ८:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकही खूश झाले आहेत. आता आगामी भागात मालिकेत काय-काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.