Tharala Tar Mag Promo 25 & 26 August : ‘ठरलं तर मग’ मालिकेत दहीहंडी उत्सवात मोठा अनर्थ घडल्याचं पाहायला मिळालं. मधुभाऊंना सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य समजतं आणि ते प्रतिमा-तन्वीचा बालपणीचा फोटो देखील पडताळून पाहतात. यावेळी नागराज त्यांच्या मागावर असतो. आता सायलीची खरी ओळख समोर आल्यावर सगळं संपणार त्यामुळे मधुभाऊंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी तो त्यांच्यावर हल्ला करतो. या हल्ल्यात मधुभाऊ गंभीर जखमी होतात, सध्या ते कोमात असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

मात्र, या सगळ्यात मधुभाऊ महत्त्वाची गोष्ट करतात ती म्हणजे, इतके जखमी असूनही मधुभाऊ अद्वैत आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर अर्जुनला सायलीचे खरे आई-बाबा जिवंत असल्याची हिंट देतात. मधुभाऊंचा खुलासा ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. आता बायकोचा भूतकाळ कसा शोधायचा या विचारात अर्जुन असतो. कारण, मधुभाऊंची प्रकृती ठीक नसल्याने अर्जुनला मार्गदर्शन करणारं, खरं सांगणारं कोणीच नसतं. शेवटी अर्जुन कुसुम ताईंना भेटण्याचा निर्णय घेतो.

अर्जुन कुसुमला सायलीच्या भूतकाळाविषयी अनेक प्रश्न विचारतो. ती आश्रमात कधी आली? तिचे बालपणीचे फोटो आहेत का? यानंतर कुसुमला सुद्धा या सगळ्यावर शंका येते. ती अर्जुनला म्हणते, सायलीचा भूतकाळ तुम्ही अचानक विचारण्याचं कारण काय आहे? यानंतर अर्जुन कुसुमला सगळं सत्य सांगतो. आता सायलीचे आई-बाबा कोण आहेत हे मी शोधून काढणार असा निश्चय अर्जुनने स्वत:च्या मनाशी केलेला असतो.

आता लवकरच मालिकेत सायली आणि अर्जुन हे दोघंच भेळ खायला गेल्याचं पाहायला मिळेल. यावेळी अर्जुनला समोर दोन लहान मुलं दिसतात. तो सायलीला सांगतो, “लहानपणी मी आणि तन्वी सुद्धा असेच खेळायचो. एकत्र गेम खेळायचो, अभ्यास करायचो…” अर्जुनचं एक-एक वाक्य नीट ऐकत सायली त्या समोर उभ्या असलेल्या मुलांकडे पाहत असते. यावेळी तिच्या डोळ्यासमोर अंधारी येते आणि सायलीला सुद्धा स्वत:चा पुसट भूतकाळ आठवतो. यामध्ये लहानपणी अर्जुन-तन्वी एकमेकांसह खेळत असल्याचं दिसतं, तन्वी सुंदर चित्र रेखाटून तिची आई प्रतिमाला दाखवतेय असंही तिला दिसतं. पण, यात कोणाचेही चेहरे तिला नीट आठवत नाहीत.

भूतकाळ असा अचानक डोळ्यासमोर आल्यामुळे सायली जोरात किंचाळते. बायकोचं हे रूप पाहून अर्जुन स्तब्ध होतो. त्याच्या मनात निर्माण झालेली शंका खरी ठरते. आता अर्जुन सायलीला तिचा भूतकाळ आठवून देण्यासाठी कसा मदत करणार? सायलीला भूतकाळ आठवल्यावर तन्वीचं सत्य सर्वांसमोर येणार का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मधुभाऊ शुद्धीवर येणार की नागराज-महिपत त्यांच्या खून करणार? या गोष्टी मालिकेच्या आगामी भागात स्पष्ट होतील.

आता कोर्ट केसनंतर मालिकेतील नव्या ट्विस्टची सुरुवात झालेली आहे. ‘ठरलं तर मग’चा हा विशेष भाग २५ आणि २६ ऑगस्टला प्रसारित केला जाणार आहे.