Tharala Tar Mag TRP Ratings : ‘ठरलं तर मग’ मालिका गेल्या महिन्याभरापासून सर्वत्र चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे वात्सल्य आश्रम केस आणि विलास खून खटल्याचा अंतिम निकाल मालिकेत अखेर जाहीर करण्यात आला आहे.

जुलै महिन्याच्या १ तारखेला पुढच्या ३० दिवसांत आश्रम केसचा निकाल जाहीर करण्यात येईल असा प्रोमो वाहिनीकडून प्रदर्शित करण्यात आला होता. यामुळे सगळे प्रेक्षक निकाल ऐकण्यासाठी आतुर झाले होते. गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा अंतिम निकाल काय लागणार? अर्जुन अखेरच्या क्षणाला यात कशी बाजी मारणार हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. अखेर ३१ जुलैच्या भागात कोर्टाने निकाल जाहीर करत मधुभाऊंची निर्दोष सुटका केली आणि साक्षी-प्रियाला अटक करण्यात आली. मनासारखा निकाल लागल्यावर प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केला होता.

या जबरदस्त अंतिम निकालाच्या सीक्वेन्ससाठी मालिकेतील सगळे कलाकार, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ, चॅनेलची टीम या सगळ्यांनीच मेहनत घेतली होती. या सगळ्यांची मेहनत फळाला आली असून टीआरपीच्या आकडेवारीत मोठी झेप घेऊन ‘ठरलं तर मग’ सिरियल पुन्हा एकदा महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे.

कोर्टकेसचा निकाल लागताना विशेषत: अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अमित भानुशालीने प्रचंड मेहनत केली होती. निकाल लागतानाचा अंतिम सीन जवळपास ५० पानांचा होता. त्यात दिवसरात्र शूटिंग सुरू होतं. पण, अखेरीस अंतिम निकालाचा भाग प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी सर्व कलाकारांचं भरभरून कौतुक केलं होतं आणि आता TRP च्या वाढलेल्या आकडेवारीच्या रुपात ‘ठरलं तर मग’च्या टीमला मोठं गिफ्ट मिळालं आहे.

Tharala Tar Mag TRP Ratings
Tharala Tar Mag TRP Ratings ( ठरलं तर मग मालिकेचा टीआरपी )

‘ठरलं तर मग’ मालिकेला गेल्या आठवड्यात तब्बल ७.१ एवढं टीआरपी रेटिंग मिळालं आहे. सध्याच्या काळात टीव्ही मालिकेला टीआरपीत ७.१ रेटिंग्ज मिळणं ही मोठी गोष्ट समजली जाते. ऐतिहासिक टीआरपी नोंदवल्यामुळे आता ‘ठरलं तर मग’ पुन्हा एकदा महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे.