Tharala Tar Mag Fame Jui Gadkari Post : ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या कोर्टरुम ड्रामामुळे प्रचंड चर्चेत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून प्रेक्षक ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या वात्सल्य आश्रम केसचा निकाल अखेर मालिकेत जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल लावण्यासाठी ३० दिवसांचा काऊंटडाऊन देण्यात आला होता. त्यामुळे महिनाभर मालिकेतल्या प्रत्येक कलाकारांनी याशिवाय पडद्यामागे काम करणाऱ्या तंत्रज्ञांनी प्रचंड मेहनत घेतल्याचं पाहायला मिळालं.
‘ठरलं तर मग’ मालिकेत कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार साक्षी शिखरेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, प्रियाला ७ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. आता प्रिया आणि साक्षी या दोघी मालिकेच्या प्रमुख खलनायिका आहेत. वात्सल्य आश्रम केस संपल्यावर आणि दोन्ही खलनायिका जेलमध्ये गेल्यावर ही मालिका संपणार का? प्रिया जेलमध्ये गेल्यामुळे सिरियलमध्ये ७ वर्षांचा लीप येणार का? अशा बऱ्याच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
मात्र, या सगळ्या चर्चांवर सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. जुईने अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि मालिका बघत राहा अशी विनंती चाहत्यांना केली आहे.
जुई गडकरी लिहिते, “मालिकेत लीप येणार नाही आणि मालिका संपणार सुद्धा नाहीये. त्यामुळे युट्यूबवरून कृपया अशा खोट्या बातम्या पसरवू नका…सोशल मीडिया पेजेसला सुद्धा हीच विनंती आहे की, अफवा पसरवू नका. मालिका सुरूच राहील…आणि आता प्रेक्षकांसमोर हळुहळू एक-एक गोष्ट उलगडत जाणार आहे. अजून बऱ्याच गोष्टींचा खुलासा होणं बाकी आहे. फक्त ‘वात्सल्य आश्रम’ केसचा निकाल लागला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, मालिका रोज बघत राहा…’ठरलं तर मग’ मालिकेच्या संपूर्ण टीमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे…तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आम्ही कायम कृतज्ञ आहोत.”

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आल्यावर प्रिया पूर्णा आजींसमोर विनवण्या करताना दिसेल. यानंतर पूर्णा आजी आणि कल्पना दोघीही तिला कानशिलात लगावतात. पण, या सगळ्यात प्रियाचं खरं रूप तिचा नवरा अश्विनसमोर आलेलं नाहीये. आता अश्विन बायकोला कशी मदत करणार? प्रियाचा खोटेपणा त्याच्यासमोर उघड होणार की नाही याचा उलगडा मालिकेच्या आगामी भागात होईल.