Tharala Tar Mag Fame Amit Bhanushali Talks About Serial Story Plot : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या कोर्टरुम ड्रामा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. वात्सल्य आश्रमाच्या केसचा अंतिम निकाल मालिकेत लवकरच जाहीर केला जाईल. तसेच विलासच्या खून खटल्यातील मुख्य आरोपीला काय शिक्षा होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. वात्सल्य आश्रमाच्या केसचा निकाल या महिन्याच्या अखेरिस लागणार आहे. ज्यासाठी फक्त ५ दिवस उरले आहेत.
अंतिम निकालासाठी कमी दिवस बाकी राहिले असल्याने सोशल मीडियावर या मालिकेच्या चाहत्यांनी ‘ठरलं तर मग’ संपणार तर नाहीये ना? असे प्रश्न मालिकेतील कलाकारांना तसेच प्रोमोमधील कमेंट्स सेक्शनमध्ये विचारले आहेत. मालिका संपतेय असा गैरसमज अनेकांना झालेला आहे. आता अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अमित भानुशालीने स्वत: व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांच्या मनातील शंका दूर केल्या आहेत.
अभिनेता व्हिडीओ शेअर करत मालिकेविषयी म्हणतो, “नमस्कार, मी अमित भानुशाली… आज मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी व्हिडीओ बनवतोय. ती म्हणजे, बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की कोर्ट केस संपणार म्हणजे मालिका संपणार का? असं अजिबात नाही. फक्त मधुभाऊंची कोर्ट केस संपतेय…ही केस संपायला जवळपास अडीच-पावणेतीन वर्ष लागले पण, अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत त्यामुळे मालिका सुरू राहणार आहे. अजून तुम्हाला खूप काही गोष्टी आमच्या मालिकेत पाहायला मिळतील.”
“खरी तन्वी कोण आहे? सायलीच खरी तन्वी आहे का? नागराज, महिपत यांच्या केसेस सुद्धा आहेत. त्यामुळे अर्जुन सुभेदार त्यांचं काम असंच सुरू ठेवतील. तुम्ही मालिका संपणार वगैरे असं काहीच मनात ठेवू नका. शो संपणार नाही कारण, या मालिकेवर तुमचं खूप प्रेम आहे, इतकी माया आहे की शो कधीच संपणार नाही. वात्सल्य आश्रम कोर्ट केस संपत असली तरी, इतर मोठे खुलासे होणे बाकी आहेत… आपण भेटूच तुमची आवडती मालिका रोज पाहत राहा फक्त स्टार प्रवाहवर.” असं अमित भानुशालीने प्रेक्षकांना सांगितलं.
दरम्यान, अंतिम निकाल लागताना शेवटच्या क्षणी साक्षी आणि प्रिया एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतील. यातून खूनाचं सत्य सर्वांसमोर उघड होणार आहे. २८ ते ३० जुलैदरम्यान मालिकेचे हे विशेष भाग प्रसारित करण्यात येणार आहेत.