Tharala Tar Mag Fame Jui Gadkari : अलीकडच्या काळात मालिकांचं शूटिंग जवळपास १२ तासांहून अधिक वेळ सुरू असतं. त्यामुळे मालिकेचा सेट हे कलाकारांसाठी जणू दुसरं घरच असतं. एकत्र काम करणाऱ्या कलाकारांचं ऑफस्क्रीन खूप चांगलं बॉण्डिंग तयार होतं. होळी, मंगळागौर, रक्षाबंधन, भाऊबीज, गणपती, दिवाळी असे सगळे सण मालिकांच्या सेटवर मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. नुकताच विविध मालिकांच्या सेटवर रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर सुद्धा रक्षाबंधन सणाचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी या मालिकेची नायिका सायली म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरीला सेटवरच्या एका खास व्यक्तीने रात्री बांधली. ती व्यक्ती नेमकी कोण आहे जाणून घेऊयात…
‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळ्याच कलाकारांचं एकमेकांशी खूप चांगलं बॉण्डिंग आहे. आमच्यामध्ये असलेली मैत्री, काम करण्याची इच्छाशक्ती, टीमवर्क आणि प्रेक्षकांचं प्रेम यामुळेच आमची मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानी असल्याचं मध्यंतरी या मालिकेच्या टीमने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ‘ठरलं तर मग’च्या सेटवरचं हेच सुंदर बॉण्डिंग चाहत्यांना जुईने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.
‘या’ व्यक्तीने जुईला बांधली रात्री
जुई गडकरीला रक्षाबंधननिमित्त तिची हेअरड्रेसर काजलने राखी बांधली आहे. जुई पोस्ट शेअर करत म्हणते, “ती आली आणि मला म्हणाली माझं असंच कायम रक्षण करा…आम्ही एकत्र रडतो, एकत्र हसतो, एकत्र भांडतो, एकत्र मजा करतो, एकत्र काम करतो…एकंदर काय तर हेच आमचं प्रेम आहे. काजल आमची हेअरड्रेसर आहे….प्रिय, काजल काळजी करू नकोस मी सदैव तुझं रक्षण करेन.”
जुई गडकरीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “तुमच्यामधलं हे बॉण्डिंग पाहून खरंच छान वाटलं, फार कमी कलाकार असे असतात” अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, येत्या आठवड्यात ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘ठरलं तर मग’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या तीन मालिकांचा महासंगम पाहायला मिळेल. यामुळे प्रेक्षकांचं सलग दीड तास मनोरंजन होणार आहे.