कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे २१ सप्टेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. जीममध्ये व्यायाम करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. पुढे त्यांना तातडीने दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये नेण्यात आले. महिनाभर त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना त्यांना आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वामध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ हा लोकप्रिय कार्यक्रम अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचे नवे पर्व काही दिवसांपूर्वी सुरु झाले. या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत अनेक सिनेकलाकारांनी हजेरी लावली आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या नव्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. राजू श्रीवास्तव यांच्या स्मरणार्थ विशेष भागाचे आयोजन करण्यात आले आहे. सुनील पाल, एहसान कुरेशी, विजय पवार, जय विजय सचान असे अनेक स्टँड अप कॉमेडीयन्स या विशेष भागामध्ये उपस्थित आहेत.

आणखी वाचा – “दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर…” तेजस्विनी पंडितच्या नव्या वेबसीरिजची पहिली झलक समोर

हा प्रोमो व्हिडीओ कपिलने देखील शेअर केला आहे. प्रोमोमध्ये तो “राजू भाईंचे नाव ऐकल्यावर चेहऱ्यावर नकळत हसू उमटते. आज आपण हसत हसत त्यांना श्रद्धांजली वाहूयात” असे म्हणत कार्यक्रमाची सुरुवात करताना दिसत आहे. त्यानंतर उपस्थित कॉमेडियन्सनी त्यांची कला सादर करत लोकांचे मनोरंजन केले. कपिलने राजू श्रीवास्तव यांच्यासाठी ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातील ‘जीना यहाँ, मरना यहाँ’ हे लोकप्रिय गाणं गायले.

आणखी वाचा – “मी हा चित्रपट…” ‘महाभारता’त कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची ‘आदिपुरुष’च्या टीझरवर प्रतिक्रिया

राजू श्रीवास्तव आणि कपिल शर्मा यांची फार घनिष्ठ मैत्री होती. त्यांनी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केले होते. कपिलच्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या कार्यक्रमामध्येही ते झळकले होते. त्यानंतर त्यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुनील पाल आणि एहसान कुरेशी यांच्यासह हजेरी लावली होती.