Star Pravah Thoda Tuza Ani Thoda Maza Serial Off Air : शिवानी सुर्वेची प्रमुख भूमिका असलेल्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेचा शेवटचा भाग आज ( १२ सप्टेंबर ) प्रसारित झाला आहे. ही मालिका गेल्यावर्षी जून महिन्यात ऑन एअर झाली होती. त्यामुळे जवळपास १४ महिने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर आता या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला आहे.

मालिकेच्या सेटवर खूप वेळ एकत्र काम करावं लागतं असल्याने सगळ्याच कलाकारांमध्ये छान बॉण्डिंग असतं. त्यामुळे मालिका संपल्यावर सर्वांचा निरोप घेणं प्रत्येक कलाकाराला जड जातं. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत गीता प्रूभ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सोनल पवारने इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करत या मालिकेचा निरोप घेतला आहे.

सोनल म्हणते, “मालिकेतल्या जगात जगण्याची मजा खूपच वेगळी असते. इथे वाट्याला येणारं प्रत्येक पात्र आपल्याला फक्त भेटून जात नाही तर नव्या पद्धतीने, नव्या रुपात जगायला शिकवतं. त्यापैकी मी साकारलेलं आणि माझ्या थोडं जास्त जवळ असणारं पात्र म्हणजे गीता प्रभू. फार कमी वेळेत मला या भूमिकेने पटकन आपलंसं करून घेतलं. मी या पात्राच्या हावभावात स्वभावात अगदी रमून गेले. या प्रवासात गीता एकटी नव्हती तर, माझ्याबरोबर सुनंदा, तात्या, गायत्री, मानसी, सूरज, तेजस भावोजी, दिनेश दादा, छाया, विनोद, आबा असे सगळेजण होते.”

“आमच्या मालिकेतील प्रभू कुटुंबासह ‘स्टार प्रवाह’च्या कुटुंबाने सुद्धा मला छान सांभाळून घेतलं. माझ्यावर विश्वास ठेवून मला गीता हे पात्र सोपावल्याबद्दल मी सर्वांची मनापासून आभारी आहे. गीताच्या आयुष्याला वळण देण्यात आमचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे सर यांचा फार महत्त्वाचा वाटा होता. दिग्दर्शकांची टीम, प्रोडक्शन, मेकअप दादा, स्पॉट दादा सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आज ही मालिका संपेल पण, प्रवास नाही. एक प्रवास संपल्यावर दुसरा सुरू होतो आणि तोच प्रवास पुन्हा एकदा सुरू व्हावा त्यासाठी पुन्हा एकदा… गणपती बाप्पा मोरया!”

“One Last Time! गीता प्रभू… आतापर्यंत जसं प्रेम करत आलात तसं इथून पुढेही कराल अशी आशा आहे. लवकरच भेटू पुन्हा एका नव्या रुपात, नवीन पात्रासह तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद स्टार प्रवाह.” असं अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सोनलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आम्ही सुद्धा या मालिकेला खूप मिस करू असं म्हटलं आहे. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांच्या मुख्य भूमिका होत्या.