Suruchi Adarkar Talks About Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात, तर अनेकदा त्या अभिनेत्री तितीक्षा तावडे व सुरुची अडारकर यांच्याबरोबर रील, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. या तिघी एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी आहेत. अशातच नुकतंच त्यांनी त्यांच्या मैत्रीबद्दल सांगितलं आहे.

ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे व सुरुची अडारकर यांची मैत्री ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेदरम्यान झाली. तितीक्षाने यामध्ये नायिकेची, ऐश्वर्या यांनी खलनायिकेची तर सुरुचीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली. त्यादरम्यानच सेटवर या तिघींची मैत्री झाली असून तिघींनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या मैत्रीबद्दलचे काही किस्सेही सांगितले आहेत.

मी फटकळ आहे – ऐश्वर्या नारकर

मुलाखतीत तितीक्षा व सुरुची यांनी ऐश्वर्या नारकर यांच्या स्वभावाबद्दल सांगितलं आहे; तर तिघींनीही एकमेकींचं कौतुक केलं आहे. मुलाखतीत तितीक्षा व सुरुची यांना ऐश्वर्या यांच्यातील कोणता गुण त्यांना घ्यायला आवडेल असं विचारल्यानंतर तितीक्षा म्हणाली, “मला तिच्यामधील सातत्य हा गुण घ्यायला आवडेल. ती खूप सातत्याने व्यायाम करत असते. प्रत्येक गोष्टीत सातत्य असतं”, तर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “मी फार फटकळ आहे, मला जे वाटतं ते मी बोलते.”

सुरुची पुढे ऐश्वर्या यांच्याबद्दल म्हणाली, “ती खरं खरं सांगते, अजिबात गोड गोड बोलत नाही, त्यामुळेच तिला स्वीकारणं सोपं जातं; कारण ती जशी आहे तशीच आहे”. तितीक्षा याबद्दल पुढे म्हणाली, “ती पहिल्या दिवशी जशी वागते तशीच ती तीन वर्षांनंतरही वागते. पहिल्या दिवशी ती सुरुचीला ती सीन करून आल्यानंतर म्हणालेली, तुझं इथे काय काम आहे, तू जा आमची रूम लहान आहे. मी म्हटलं, अगं ताई ती नवीन आहे, तिला कळणार नाही. दुसऱ्या दिवशी पण तिने तेच केलं मग एका आठवड्याने सुरुचीच म्हणाली, आता मी इथेच बसणार आहे, तुला काय हवं ते कर.”

सुरुची पुढे म्हणाली, “मग जेव्हा ती नसायची तेव्हा मी तिला फोन करून, बघ मी आलीये आणि तुझ्या जागेवर बसले आहे असं म्हणायचे.” तितीक्षा पुढे यामागचं कारण सांगत म्हणाली, “ती तुझ्याशी असं बोलतेय म्हणजे तू तिच्या हक्काची व्यक्ती आहे. ती बाकीच्यांशी असं बोलायला जाणार नाही, मला उलट तिचा तो चांगला गुण वाटतो.”