Tu Hi Re Majha Mitwa : स्टार प्रवाहवर गेल्यावर्षी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली, ही मालिका म्हणजे ‘तू ही रे माझा मितवा’. २३ डिसेंबर २०२४ पासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. मालिकेतील अर्णव-ईश्वरी म्हणजेच अभिजीत आमकर आणि ईश्वरी जोग ही नवीन जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
मालिका सुरू झाल्यापासूनच अर्णव-ईश्वरीमध्ये सारखीच भांडणं होत असल्याचे पहायला मिळत होते. मात्र आता कुठेतरी अर्णवच्या मनात ईश्वरीबद्दल प्रेमभावना निर्माण झाली आहे. याबद्दल त्याने अजून ईश्वरीला काही सांगितलेलं नाही. पण हे सांगण्यासाठी तो प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता त्यांची प्रेमकहाणी सुरू होण्याआधीच संपणार की काय? असं वाटत आहे.
ईश्वरीने नुकताच तिचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे आणि या व्यवसायाच्या पूजेच्या दिवशी अर्णवला राकेशचाही संशय आला आहे. त्यात भर म्हणजे ईश्वरीच्या आईचं आणि आत्याचं ईश्वरीचं राकेशशी लग्न लावून देणार असल्याचं बोलणं अर्णवने ऐकलं आहे. त्यामुळे अर्णव आता ईश्वरीकडे त्याचं प्रेम व्यक्त न करता लावण्याशी लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.
तू ही रे माझा मितवा मालिका प्रोमो
मालिकेतील या नवीन ट्विस्टचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये ईश्वरी अर्णवला पेढा देते, तेव्हा अर्णव तिला म्हणतो, “पेढ्यांवरुन मला आठवलं… मला ‘ईश्वरी स्वीट्स’ला एक मोठी ऑर्डर द्यायची आहे. अर्णव राजेशिर्के लावण्याबरोबर लग्न करत आहे. तू सुद्धा राकेशशी लग्न करत आहेस ना? त्याबद्दल तुझं अभिनंदन”. यानंतर अर्णव त्याच्या हातातला पेढा कुस्करून टाकतो.
त्यामुळे आता अर्णव-ईश्वरी यांच्यातील प्रेम फुलण्याआधीच संपणार की काय? अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत. दोघांची लव्हस्टोरी पाहण्याची उत्सुकता अनेक चाहत्यांनी व्यक्त केल्या होत्या. मात्र आता राकेशमुळे दोघांची लव्हस्टोरी सुरू होण्याआधीच संपणार असल्याचं म्हटलं जात आहे. मालिकेचा हा नवीन भाग गुरुवार, १७ जुलै रोजी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
दरम्यान, मालिकेत आता अर्णवचे लावण्याबरोबर आणि ईश्वरीचं राकेशबरोबर लग्न होणार का? की यात पुन्हा नवीन ट्विस्ट येणार? तसंच अर्णवला त्याच्या जिजूचं म्हणजेच राकेशचं नेमकं सत्य कळणार का? हे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.