Tu Hi Re Maza Mitwa Fame Ruchira Jadhav Education : रुचिरा जाधव मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’वरील ‘तू ही रे माझा मितवा’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेतून पाहायला मिळत आहे. अशातच आता तिने नुकतीच एक मुलाखत दिली असून यामध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे.
रुचिरा जाधव सध्या ‘तू ही रे माझा मितवा’मध्ये खलनायिकेच्या भूमिकेतून झळकत आहे. अशातच अभिनेत्रीने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली असून यामध्ये तिने तिच्या कुटुंबाबद्दल, करिअरबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. रुचिरा गेली अनेक वर्षं या क्षेत्रात असली तरी ती या क्षेत्रात कशी आली आणि तिने याव्यतिरिक्त कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेतलं आहे याबद्दल सांगितलं आहे.
रुचिराने मुलाखतीत तिचं बालपण सर्वसामान्यांसारखं गेलं असून ती चाळीत लहानाची मोठी झाली असल्याचं म्हटलं आहे. तिला यामध्ये “मोठी होत असताना स्वप्न बघताना कधी असं वाटलं का की तुझ्याकडे ती स्वप्न बघण्यासाठी तितकं पोषक वातावरण नाहीये?” असं विचारण्यात आलेलं. यावर रुचिरा म्हणाली, “मी कधी असा विचारच केला नाही, कारण माझे बाबा पोस्टात काम करायचे. त्यांनी कधी जाणवूच दिलं नाही की काय परिस्थिती आहे वगैरे.”
रुचिरा याबद्दल पुढे म्हणाली, “त्यावेळी बसचे तिकीट चार रुपये होते, पण माझे बाबा चालत जायचे, त्यांनी ते चार रुपये रोज वाचवलेत. पण, मी नेहमी कॉलेजला ऑटोने गेलीये, मी नेहमी ट्रेननेही फस्ट क्लासनेच प्रवास केलाय; तेव्हा ती जाणीव नव्हती, नंतर ती झाली तेव्हा या गोष्टींची किंमत कळाली आणि कदाचित हेच कारण आहे की मला ती मर्यादा कधी जाणवलीच नाही. मी स्वप्न बघत गेले, मी आर्टिस्ट आहे, मला पेंटिंगची आवड आहे, माझा स्टाइलिंग आणि फॅशन डिझायनिंगकडे फार कल होता; बाबांनी फक्त तिथे मला थांबवलेलं की फॅशन डिझायनिंग करू नकोस, तू तुझं शिक्षण पूर्ण कर.”
रुचिरा जाधवचं शिक्षण किती?
रुचिराने पुढे तिच्या शिक्षणाबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “बाबांच्या सांगण्यावरून शिक्षण पूर्ण केलं. मी बीएससी, एमएससी पूर्ण केलं आहे. त्यानंतर मी थिएटर केलं, त्यामुळे मला असं वाटतं जे झालं ते चांगल्यासाठीच झालं.” रुचिराने यामध्ये तिला शिक्षणाची आधीपासून आवड होती आणि ती अभ्यासात हुशारही होती असंही सांगितलं आहे.