Tu Hi Re Maza Mitwa Serial’s Actor Shares Post : टीव्ही हे मनोरंजनाचं एक सहज उपलब्ध होणारं माध्यम आहे. टीव्हीमुळे विविध मालिका आणि कार्यक्रम अगदी घरबसल्या पाहता येतात. त्यामुळे टीव्हीचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. टीव्हीवरील मालिका हा तर अनेकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्या टीव्हीवर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत, जे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करीत आहेत.
टीव्हीवरील विविध कथानक असलेल्या मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करीत आहे. या मालिकांमुळे त्यातील कलाकारांनासुद्धा प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळते. मात्र, त्यासाठी या कलाकारांनाही तितकीच मेहनत करावी लागते. टीव्हीवरील मालिकांचा एक भाग २०-२५ मिनिटांतच संपतो. परंतु, हाच भाग चित्रित करण्यासाठी अनेक तास किंवा अनेक दिवसदेखील लागतात.
सध्याच्या टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कलाकारांना खूपच मेहनत घ्यावी लागते. त्याशिवाय मालिकेत जर एखादा विशेष प्रसंग असेल, तर त्यासाठीचं शूटिंग आणि त्याची तयारी यासाठी बरेच कष्ट करावे लागतात. मग त्यात कधी कलाकारांची झोप होत नाही, कधी वेळेवर जेवण होत नाही… मात्र हे कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कायमच खूप मेहनत घेताना दिसून येतात. याच मेहनतीबद्दल लोकप्रिय मराठी अभिनेत्याने खास पोस्ट शेअर केली आहे, हा अभिनेता म्हणजे अभिजीत आमकर.
अभिजीत सध्या स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेत लावण्या आणि त्याचं लग्न होताना पाहायला मिळालं. मात्र, त्यात मोठा ट्विस्ट आला, तो म्हणजे त्याने ईश्वरीच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र बांधलं. याच लग्नाच्या सीनचं शूटिंग मालिकेत सुरू आहे आणि हे शूटिंग करतानाची त्याची झालेली धावपळ आणि मेहनत त्याने पोस्टमधून शेअर केली आहे. तसेच या धावपळीचा अनुभवही त्याने शेअर केला आहे.
या पोस्टमध्ये अभिजीत म्हणतो, “अरे बापरे… किती धावपळीचा आठवडा होता… खूप गडबड, गोंधळ आणि खूप थकवणारा; पण तरीही तितकाच सुंदर… या लग्नाच्या शूटमध्ये सगळं होतं. अगदी लाइट्स होते, ड्रामा होता आणि खूप कमी झोपही… काही दिवस मी अगदीच गोंधळलेलो होतो; पण अखेर मला माझा सूर सापडला. मालिकेती सीन्स, त्यातील भावभावना आणि वास्तविक आयुष्य एकत्र सांभाळत मी मल्टिटास्किंग करीत राहिलो…”
त्यानंतर तो सांगतो, “हो… खूप थकलो… पण जेव्हा मला मी स्वतःसाठी उभं राहू शकत नाही, असं वाटलं तेव्हा मला मनाला धीर आणि आधार देणारे काही लोक अनपेक्षितरीत्या भेटले. मनाला शांतता मिळाली. खूप भारावून गेलो होतो… जणू देवानंच त्यांना देवदूत म्हणून पाठवलं आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचाच मनापासून आभारी आहे. कृतज्ञ आहे. असंच आमच्यावर प्रेम करीत राहा आणि रोज मालिका पाहत राहा.”
अभिजीत आमकर इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, अभिजीतनं शेअर केलेल्या या पोस्टखाली त्याला अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेक चाहत्यांनी अभिजीतच्या या मेहनतीचं कौतुक केलं आहे. फक्त चाहतेच नव्हे, तर अनेक कलाकार मंडळींनीसुद्धा अभिजीतच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करीत त्याच्या मेहनतीची प्रशंसा केली आहे.