Hardeek Joshi Pandharpur Wari Video : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेला सर्वांचा लाडका राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी. हार्दिक जोशीने या मालिकेत साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. ही मालिका संपून चार वर्षे झाली; तरीही त्याची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आजही हार्दिकला अनेक चाहते राणादा या भूमिकेमुळे ओळखतात. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हार्दिक सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो.
हार्दिक सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे; हा व्हिडीओ आहे आषाढी वारीचा. आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने जात आहे. लाखों वारकरी पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होत त्याचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत.
अशातच यंदाच्या वारीत हार्दिक जोशीही सहभागी झाला आहे आणि याची खास झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. हार्दिकने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये हार्दिक इतर वारकऱ्यांसह हातात टाळ घेऊन भजनात दंग झाला असल्याचं पहायला मिळत आहे. तसंच त्याने फुगडीही खेळली. शिवाय वारीत वारकरी जे पारंपरिक खेळ खेळतात, त्यातही हार्दिकने सहभाग घेतला. यासह हार्दिकने वारीत स्वत:च्या हाताने अन्नदानही केलं.
हार्दिक जोशी पंढरपूर वारी व्हिडीओ
“जय जय राम कृष्ण हरि, माऊली कृपा” असं म्हणत हार्दिकने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हार्दिकचा हा व्हिडीओ साध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच अनेकांनी या व्हिडीओखाली त्याचं कौतुक केलं आहे. “राम कृष्ण हरी”, “माऊली खुप छान”, “जय हरी विठ्ठल” या अनेक अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी या व्हिडीओवर व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान यंदाच्या पंढरपूर वारीत अनेक मराठी कलाकारांनी सहभाग घेतला आहे. अनेक टीव्ही कलाकारांनी यंदाच्या वारीत सहभाग घेतला होता, त्याचे व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रिंकू राजगुरू, सायली संजीव, सायली पाटील, छाया कदम यांसह अनेक कलाकार यंदाच्या वारीत सहभागी झाले आहेत.