Tula Japnar Ahe Fame Tanishka Vishe Talks About Her Journey : कलाकार म्हटलं की संघर्ष आणि आव्हानं याचा सामना त्यांना करावाच लागतो असं म्हटलं जातं. इंडस्ट्रीत काम आणि लोकप्रियता मिळवणं सोपं नसलं तरी अनेक कलाकार स्वबळावर ते करून दाखवतात आणि त्यांच्या कामामुळे इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी जागा निर्माण करतात. असंच काहीसं ‘तुला जपणार आहे’ फेम अभिनेत्रीबरोबरही घडलं.
‘तुला जपणार आहे’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री तनिष्का विशे हिने तिच्या संघर्षकाळाबद्दल सांगितलं आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तनिष्काने तिच्या संघर्षकाळाबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिच्या भावानेही तिचं कौतुक केलं आहे. तनिष्का अभिनयात काम करण्यापूर्वी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करायची, याबद्दल तिने सांगितलं आहे.
तनिष्का पूर्वी बॅकग्राउंड डान्सर म्हणून करायची काम
मुलाखतीत तनिष्काचा भाऊ कौस्तुभ विशे तिचं कौतुक करत म्हणाला, “तिचा खूप अभिमान वाटतो. तिने भरत जाधव सरांबरोबर काम केलंय. मोठ मोठ्या संधी तिला मिळत आल्या आहेत. आम्हाला तिचा अभिमान यासाठी वाटतो की २०१० दरम्यान तिने काम करायला सुरू केलेलं. तेव्हा ती बॅकग्राउंड डान्सर होती. तिने पुरस्कार सोहळ्यांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं आहे.” तनिष्का याबद्दल म्हणाली, “मी बॅकग्राउंड डान्सर होते. त्यानंतर अवधूत गुप्तेच्या कार्यक्रमातही मी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं आहे.”
तनिष्काने पुढे मुलाखतीत तिच्या भावाबद्दलही सांगितलं आहे. ती तिच्या भावावर खूप अवलंबून असून प्रत्येक गोष्टीसाठी तिला त्याची मदत लागते याबद्दल तिने सांगितलं आहे. ती म्हणाली, “मी त्याच्यावर खूप निर्भर आहे. माझं प्रत्येक छोटं मोठं काम तो करतो.”
तनिष्का मराठी इंडस्ट्रीतील नवोदित कलाकारांपैकी एक आहे. तिने मालिका व चित्रपटामध्ये काम केलं असून ती हळूहळू इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करू पाहत आहे. तनिष्का खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ते ‘स्टार प्रवाह’वरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे. यामध्ये तिने दीपिका ही भूमिका साकारलेली. त्यानंतर तिने अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर चित्रपटातही काम केलं.
तनिष्का सध्या ‘झी मराठी’वरील ‘तुला जपणार आहे’ मालिकेत अनन्या ही भूमिका साकारत आहे. ‘रंग माझा वेगळा’नंतर या मालिकेतून ती एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तनिष्का सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
