Hrishikesh Shelar : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. २५ मे रोजी या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारित करण्यात आला. यामधील अक्षरा-अधिपतीची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली होती. या मालिकेत अक्षराची भूमिका शिवानी रांगोळे तर, अधिपतीची भूमिका अभिनेता हृषिकेश शेलारने साकारली होती.

तब्बल दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर आता या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला आहे. मालिका संपल्यावर शिवानी रांगोळे, स्वप्नील राजशेखर, कविता मेढेकर या कलाकारांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता या कलाकारांपाठोपाठ हृषिकेश शेलारने देखील मालिकेबद्दल पोस्ट शेअर केली आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत हृषिकेशने पहिल्यांदाच नायक म्हणून मुख्य भूमिका साकारली होती. याआधी तो ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता.

अधिपतीची भूमिका साकारणाऱ्या हृषिकेश शेलारने भावुक पोस्ट शेअर करत निर्मात्यांसह ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

“आपल्याला मस्त वाटत असतं, आपण बच्चन आहोत..! पण आपल्यावर विश्वास ठेवून योग्य वेळी योग्य संधी देणारे लोक हवेत. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या आमच्या मालिकेचा प्रवास आता संपला. या मालिकेनं मला पहिल्यांदाच ‘नायक’ म्हणून घराघरांत पोहोचवलं. या मालिकेसाठी, आमच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी, निर्माते एरिकॉन टेलिफिल्म्स, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, ‘झी मराठी’ वाहिनी, आमच्या मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड या सगळ्या मंडळींनी माझ्यावर विश्वास ठेवला. यानंतर, तमाम मराठी प्रेक्षकांनी ‘अधिपती’ला स्वीकारलं, मनापासून प्रेम केलं म्हणून मी पहिल्यांदा ‘हिरो’ म्हणून उभा राहू शकलो. मजा आली..!” अशी पोस्ट शेअर करत अधिपतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हृषिकेश शेलारच्या या पोस्ट नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “तू खरा हिरो आहेस”, “अधिपती या तुमच्या पात्राने आमच्या मनावर दोन वर्षे अधिपत्य गाजवलं तुमची आठवण येईल सर”, “मिस यू अधिपती”, “फेव्हरेट अभिनेता अधिपती”, “अधिपतीची भूमिका तू जगला आहेस हृषी” अशा प्रतिक्रिया अभिनेत्याच्या पोस्टवर आल्या आहेत.