Hrishikesh Shelar & Sneha Kate Talks About Their First Meeting : हृषिकेश शेलार मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून तो विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. सध्या तो ‘शिकायला गेलो एक’ या नाटकामध्ये पाहायला मिळत आहे. अशातच त्याने ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमात हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे.
‘झी मराठी’ने सोशल मीडिया पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हृषिकेश शेलार व त्याची बायको स्नेहा काटे हीसुद्धा ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमात उपस्थित असून. यावेळी दोघांनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हे दोघे त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना दिसतात. स्नेहा काटे हृषिकेशबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल सांगत म्हणाली, “हृषिकेश ऑडिशन देत असताना तिथे मी व माझी मैत्रीणपण होतो. आम्ही तिथल्या सरांना आम्हाला ऑडिशन बघू द्या ना म्हणत विनंती केलेली. तेव्हा हृषिकेशची एन्ट्री झाली आणि तो त्याचं ऑडिशन देत होता. तेव्हा मला त्याचं काम आवडलं. मी मैत्रीणीला म्हटलं छान आहे हा मुलगा चांगला अभिनय करतोय. तिला मी कानात सांगितलं की, बघ याची निवड होणार.”
हृषिकेश व स्नेहा यांची पहिली भेट ऑडिशनच्या ठिकाणी झालेली असं त्यांनी यामध्ये सांगितलं आहे. यासह स्नेहा व हृषिकेशने त्यांच्या एकमेकांबरोबरच्या जुन्या आठवणींसुद्धा सांगितलं आहे. यावेळी त्यांनी एकमेकांसाठी खास उखाणेसुद्धा घेतले आहेत. स्नेहाने हृषिकेशसाठी “रोज सकाळी उठून खाल्लं पाहिजे अॅपल हृषिकेशराव मी आपलं नातं आयुष्यभर जपल.” असा गमतीशीर उखाणा घेतलेला पाहायला मिळाला. तर हृषिकेशनेही बायकोसाठी दोन उखाणे घेतल्याचं पाहायला मिळालं. त्याने “स्नेहा आहे नागपुरची तिच्या हातात संत्री, तिच आमच्या घराची एकमेव पालक मंत्री.” असा भन्नाट उखाणा घेतला आहे.
हृषिकेश व स्नेहा यांनी पूर्वी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलेलं. त्यावेळीसुद्धा त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलेले. तेव्हा हृषिकेश म्हणालेले की, “आमची पहिली भेट मुंबई युनिवर्सिटीमध्ये झालेली. मी तिथे ऑडिशनसाठी गेलेलो. ही मला एक वर्ष सीनीयर होती तिथे आणि आम्हाला दोघांनाही एकमेकांचं काम खूप आवडायचं. आम्ही आधी खूप चांगले मित्र होतो एकमेकांचे आणि मग नंतर आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.”
दरम्यान, हृषिकेश व स्नेहाने ८ वर्षांपूर्वी एकमेकांबरोबर लग्न केलं असून त्यांना आता एक गोड मुलगीसुद्धा आहे. त्यांनी त्यांच्या लेकीचं नाव रुही असं ठेवलं आहे. तर स्नेहा देखील अभिनेत्री असून तिने ‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ या मालिकेत काम केलं होतं. यासह तिने ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारलेली.