Hrishikesh Shelar’s wife Shared A Post : अभिनेता हृषिकेश शेलार मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. त्यामधून त्याने पहिल्यांदाच मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. या मालिकेत त्याने साकारलेल्या अधिपतीच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला. तर यातील अधिपती-अक्षरा या जोडीनंसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
अधिपती-अक्षरा यांची प्रेक्षकांमध्ये क्रेझ होती. या दोघांमधील ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला आवडायची. अशातच आता ह्रषिकेशच्या खऱ्या आयुष्यातील मास्तरीणबाई म्हणजेच त्याची बायको स्नेहा मंगलने सोशल मीडियावरून अभिनेत्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. हृषिकेशचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानेच स्नेहाने ही पोस्ट केली आहे आणि याला तिने खास कॅप्शनही दिली आहे.
स्नेहाने हृषिकेश व कुटुंबीयांबरोबरचे काही खास फोटो पोस्ट केलेले यामधून पाहायला मिळतात. हृषिकेश, स्नेहा, त्यांची मुलगी आणि ह्रषिकेशचे आई-बाबा अशा त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टला स्नेहाने “वाढदिवसाच्या तुला खूप शुभेच्छा. हे वर्ष तुझ्यासाठी आनंदाचे जावो. तुला जे करायला आवडतं, तू तेच करत आहेस. असेच काम करीत राहा आणि पुढे जात राहा, तुला खूप यश मिळो” असं कॅप्शन दिलेलं पाहायला मिळतं.
हृषिकेशनेही या पोस्टखाली हार्ट इमोजी पोस्ट करीत कमेंट केली आहे. त्यासह हृषिकेशच्या चाहत्यांनीही या पोस्टखाली कमेंट्समधून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हृषिकेश शेलारची बायको स्नेहाबद्दल बोलायचं झालं, तर स्नेहासुद्धा अभिनेत्री असून, तिनं यापूर्वी टेलिव्हिजनवरील काही मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु, सध्या ती अभिनय क्षेत्रापासून लांब असून ती तिच्या मुलीचं संगोपन करीत आहे.
दरम्यान, हृषिकेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, हृषिकेश ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतून झळकला होता. त्याच्या या मालिकेनं जवळपास दोन वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं. तर या वर्षी मे महिन्यात या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता हृषिकेश शेलार ‘शिकायला गेलो एक’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. त्यामुळे अभिनेता आता एका वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.