Shivani Rangole shares Photo with Chhaya Kadam: मोठ्या पडद्यावर दिसणारे किंवा टीव्हीवर दररोज मनोरंजन करणारे कलाकार असो. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या सेलेब्रिटीच्या आयुष्यात काय चालले आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता असते.

कलाकारदेखील सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत त्यांच्या व्यावसायिक तसेच खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर करतात. अनेकदा सोशल मीडियावरील रीलच्या माध्यमातून हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता अभिनेत्री शिवानी रांगोळेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

शिवानी रांगोळेची छाया कदम यांच्यासाठी खास पोस्ट

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्री शिवानी रांगोळेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. शिवानीने लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिलेली कॅप्शन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

शिवानी रांगोळेने लिहिले, “छाया ताई, तुला प्रत्येक वेळी भेटून इतकं सकारात्मक वाटतं. एकत्र काम केलेलं नसूनही आपण नेहमीच इतक्या हक्काने एकमेकींशी बोलू शकतो, हा विचार करून खूप छान वाटतं. तू खरंच इतरांपेक्षा वेगळी आहेस”, असे म्हणत शिवानीने छाया कदम यांच्याविषयी प्रेम व्यक्त केले.

छाया कदम या त्यांच्या विविध भूमिकांसाठी ओळखल्या जातात. ‘सैराट’, ‘लापता लेडीज’, ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’, ‘सिस्टर मिडनाइट’, ‘फँड्री’, ‘झुंड’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्या सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतात.

नुकतेच त्यांनी कोकणातील व्हिडीओ शेअर केले होते. मुलाखतींमधील त्यांच्या वक्तव्यांचीदेखील मोठी चर्चा होताना दिसते. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत कोणकोणत्या प्राण्यांचे आजवर मांस खाल्ले आहे, यावर वक्तव्य केले.

शिवानी रांगोळेच्या कामाबाबत बोलायचे तर अभिनेत्री सध्या झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत असलेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिची अक्षरा ही भूमिका प्रचंड गाजली. अक्षरा व अधिपती ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. अक्षरा ही सुशिक्षित आहे, शाळेत शिक्षिका आहे; तर अधिपती हा अशिक्षित आहे. मात्र, लग्नानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. सध्या भुवनेश्वरीमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे दिसत आहे. मात्र, तरीही ते एकमेकांची काळजी करताना दिसतात.

दरम्यान, ‘आता तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा व अधिपती पुन्हा कधी एकत्र येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.