दिवंगत अभिनेते इरफान खान यांनी ‘कारवां’, ‘पीकू’, ‘करीब करीब सिंगल’, अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याबरोबरच, त्यांचा ‘मदारी’ हा चित्रपटदेखील मोठा गाजला. या चित्रपटात लोकप्रिय मराठी अभिनेत्याने महत्वाची भूमिका साकारली होती.
अभिनेते तुषार दळवी सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेमुळे चर्चेत आहेत. या मालिकेत त्यांनी श्रीनिवास ही भूमिका साकारली आहे. याआधी अनेक हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
‘या’ हिंदी चित्रपटात तुषार दळवी महत्त्वाच्या भूमिकेत होते
तुषार दळवी यांनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत काम करण्याचा अनुभव सांगितला. निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मदारी’ चित्रपटातदेखील तुषार दळवी महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटात दिवंगत अभिनेते इरफान खान प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगत तुषार दळवी म्हणाले, “निशी माझा खूप चांगला मित्र होता. आमची अनेक वर्षांची मैत्री होती. आम्हाला एकमेकांबरोबर काम करायचं होतं, पण तशी संधी मिळत नव्हती. मात्र, मी माझं नशीब मानतो की त्याच्याबरोबर जे काम करता आलं ते मदारीसारख्या चित्रपटात केलं.”
“कधीतरी आमच्या दोन-चार भेटीगाठी…”
इरफान खान यांच्याबद्दल काम करण्याचा अनुभव सांगत तुषार दळवी म्हणाले, “इरफान खान पूर्वी ‘चंद्रकांता’ नावाचा एक शो करायचे. त्याच प्रोडक्शन हाऊसचा ‘फिर भी दिल है हिंदूस्तानी’ हा शो मी करायचो. तर दोन्ही शो एकाच प्रोडक्शनचे असल्याने कधीतरी आमच्या दोन-चार भेटीगाठी व्हायच्या. मी त्यांचा आधीपासूनच चाहता होतो.”
“इरफान खान आणि मी क्लायमॅक्स सीन शूट करणार होतो. ते जेव्हा सेटवर आले तेव्हा ते तयारीने आले. त्यांना सगळं माहीत होतं. मला त्यांनी कधी कुठल्याही प्रकारे म्हणजे आडवाटेनेसुद्धा सांगण्याचा किंवा माझ्यावर हावी होण्याचा किंवा मी इरफान खान आहे आणि हा महत्वाचा क्लायमॅक्स आहे, असं दाखवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. पूर्वी आम्ही जसं दोन-चारदा भेटलो होतो, त्याचप्रकारे भेटून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. मी म्हटलं तसं की, खूप काही गप्पा-गोष्टींमध्ये ते फार काही सामील व्हायचे नाहीत. ते सामीलही व्हायचे आणि थोडे अलिप्तसुद्धा होते. पण, मला जाणवत होतं की त्यांचं लक्ष होतं. त्या सीनमध्ये ते पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करायचे. तो सीन करताना ज्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला, ते मला जाणवलं.
“…म्हणून पुन्हा एकदा मी त्यांच्या जास्त प्रेमात पडलो”
“अभिनेता म्हणून मला सराव करताना जाणवायचं की त्यांनी अमुक असा वेगळा विचार केला आहे, त्यामुळे मलासुद्धा काही गोष्टी सुचल्या. त्यांच्याकडे पाहून प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली. त्यांचा एकूण गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन, वावरणं, एकूण ते ज्या दृष्टिकोनातून सीनकडे पाहायचे, तेव्हा मला समजलं की त्यांचं काम पाहताना कमाल का वाटतं. त्या काही दिवसांत त्यांच्याकडे बघून शिकायला मिळालं, ते कुठल्याच वर्कशॉपमध्ये शिकायला मिळालं नसतं. फक्त त्यांचं निरीक्षण करून, त्यांच्याकडे बघून, बोलताना खूप गोष्टी समजल्या. ज्या गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या, त्या गोष्टींवरून अंदाज बांधता आला की ते इरफान खान का आहेत. एखादा सीन करताना त्यांचा काय विचार असतो, किती मेहनत असते, हे मला पाहायला मिळाले. म्हणून पुन्हा एकदा मी त्यांच्या जास्त प्रेमात पडलो.
दरम्यान, २०१६ साली ‘मदारी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.