अभिनेत्री उमा पेंढारकर हिने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. तिच्या सहज सुंदर अभिनयाचं सगळेजण नेहमीच कौतुक करत असतात. सध्या ती ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘योग योगेश्वर जयशंकर’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या मालिकेचं शूटिंग करत असताना तिला शंकर महाराजांचा आलेला विलक्षण अनुभव तिने नुकताच शेअर केला.

उमा या मालिकेत शंकर महाराजांची आई ‘पार्वतीबाई’ ही भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने मालिकेतील सहकलाकारांबरोबर तिने ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी तिने सांगितलेल्या एका अनुभवाने सर्वांचाच लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा : ‘कट्यार काळजात घुसली’ला ७ वर्ष पूर्ण होताच सुबोध भावेची मोठी घोषणा, पुन्हा प्रेक्षकांना देणार सांगीतिक मेजवानी

या मुलाखतीत तिला “शूटिंगदरम्यान शंकर महाराजांचा काही अनुभव आला आहे का ?” असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा उमा म्हणाली, “आम्ही शेतात शूटिंग करत असल्यामुळे साप, नाग हे आमच्या आजूबाजूला खूप असतात. नुकतंच आम्ही रात्री शूट करत होतो आणि मी आमच्या साउंड दादांशी बोलत उभी होते. बराच वेळ आमचं बोलणं सुरु होतं आणि मी जेव्हा पाय हलवला तेव्हा माझ्या पायाचा अगदी बाजूला घोणस ही शांत बसून होती. घोणस हा सापाचा अत्यंत विषारी प्रकार मानला जातो. जसा मी पाय हलवला तशी ती सळसळत तिच्या वेगळ्या दिशेला निघून गेली.”

पुढे उमा म्हणाली, “मग सर्पमित्र आले आणि त्यांनी ती घोणस पकडली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, “ताई, तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. आजच घोणस चावल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकावर पाय कापण्याची वेळ आलेली आहे.” तसंच त्यांनी मला फोटोही दाखवले. आमच्या सेटवर शंकर महाराजांचं एक छोटासं मंदिर केलं आहे त्याच्यासमोर मी उभी होते आणि घोणस माझ्या बाजूला असूनही तिने मला काही केलं नाही याहून मोठा त्यांचा काय चमत्कार असू शकतो!”

हेही वाचा : Photos : ‘टाळ वाजे, वीणा वाजे…’, गणेशोत्सवानिमित्त ‘अगंबाई सुनबाई’ फेम अभिनेत्रीचं खास फोटोशूट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमाचं हे उत्तर ऐकून सर्वजण आवाक् झाले. इतक्या कठीण प्रसंगातून ती सुखरूप बाहेर पडली हा शंकर महाराजांचाच आशीर्वाद आहे, अशा प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. उमाच्या आधीच्या भूमिकांप्रमाणेच या भूमिकेला आणि या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे, त्याबद्दलही तिने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले.