काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर ‘उंच माझा झोका’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतून रमाबाई रानडे यांचा जीवन प्रवास उलगडला गेला. या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका तेजश्री वालावलकर हिने साकारली होती. त्या भूमिकेसाठी तिचं खूप कौतुक झालं. त्यानंतरही तेजश्री काही कलाकृतींमध्ये झळकली पण गेली काही वर्षं ती मनोरंजन सृष्टीपासून दूर आहे. याचं कारण काय हे आता स्वतः तेजश्रीनेच सांगितलं आहे.

‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना तिने सांगितलं, “उंच माझा झोका ही मालिका जेव्हा मी केली तेव्हा मी पाचवीत होते. माझ्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात मी ३ वर्षांची असतानाच झाली होती. काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर मला ‘उंच माझा झोका’ ही मालिका मिळाली आणि तिने मला घराघरात पोहोचवलं.”

हेही वाचा : ‘उंच माझा झोका’तील छोटी रमा आता दिसते ‘अशी’, तेजश्रीबरोबरचा फोटो पोस्ट करत मालिकेचे दिग्दर्शक म्हणाले…

पुढे ती म्हणाली, “ती मालिका संपल्यानंतर पुढच्या २ वर्षांत मी ‘मात’ आणि ‘चिंतामणी’ हे दोन चित्रपट केले. ‘मात’ या चित्रपटासाठी मला शासनाचा पुरस्कारही मिळाला. पण हे चित्रपट केल्यानंतर माझ्याकडे येणाऱ्या संधी या ‘उंच माझा झोका’ला अनुसरून होत्या किंवा माझ्या वयापेक्षा अगदीच मोठ्या होत्या. त्यामुळे मी अभिनयातून थोडासा ब्रेक घेतला. याचं मुख्य कारण म्हणजे ‘उंच माझा झोका’मुळे माझी प्रेक्षकांमध्ये तयार झालेली प्रतिमा मला बदलायची होती.”

आणखी वाचा : “सगळं छान चाललंय असं वाटेल पण…”, ‘उंच माझा झोका’चे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “दहावी झाल्यानंतर मी ‘झिंदगी नॉट आउट’ ही मालिका केली. पण या मालिकेनंतर लॉकडाऊनच्या काळात अभिनयाबरोबरच प्रोडक्शनबद्दल माहिती घेणं, अभिनयाच्या दृष्टीने वाचन करणं, वेगवेगळे जुने चित्रपट आणि नाटकं बघणं या गोष्टी मी अभ्यासासारख्या करत होते. मला भविष्यात अभिनयातच करिअर करायचं असल्याने अभिनयाव्यतिरिक्त कलाकृती तयार करताना ज्या ज्या बाजू महत्त्वाच्या असतात त्यांची माहितीकरून घेत होते आणि अजूनही तो अभ्यास सुरु आहे. म्हणून मी गेली काही वर्षं कोणत्याही मालिका किंवा चित्रपटामध्ये काम केलं नाही.”