Usha Nadkarni Video: ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी सध्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये विविध पदार्थ बनवून परीक्षकांची मनं जिंकताना दिसत आहेत. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा नवीन प्रोमोने पाहून चाहते भावुक झाले आहेत, कारण ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी त्यांच्या दिवंगत भावाबद्दल बोलताना रडू लागल्या. या प्रोमोमध्ये त्या त्यांच्या धाकट्या भावाबद्दल बोलताना दिसतात. भावाचं कौतुक त्यांनी केलं. तसेच त्याची खूप आठवण येत असल्याचं त्यांनी सांगितलं. शोमध्ये उषाताईंना रडताना पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

फराह खानने स्पर्धकांना ‘फेस्टिव्हल’ ही थीम लक्षात ठेवून स्पेशल डिश बनवण्यास सांगितलं. उषाताई मोदक बनवण्याची तयारी करतात. त्यानंतर शेफ विकास खन्ना यांनी अभिनेत्री उषाला सणांचे महत्त्व विचारले. याबद्दल बोलताना उषा नाडकर्णी यांना त्यांच्या धाकट्या भावाची आठवण झाली. काम करत असताना आपल्या आई व भावाने मुलाला सांभाळलं, तो माझ्यापेक्षा लहान होता. तोच माझं आयुष्य होता, पण त्याचेही यावर्षी निधन झाले. काही महिन्यापूर्वी तो सोडून गेला, मला त्याची खूप आठवण येते, असं उषाताई म्हणाल्या आणि रडू लागल्या. त्यानंतर शेफ विकासनी न्यूयॉर्कमध्ये असताना बहिणीचे निधन झाले आणि त्यानंतरच्या पहिल्या सणाला जाणवलेल्या एकटेपणाबद्दल असं सांगितलं.

उषाताईंचं बोलणं ऐकून शेफ विकास खन्ना भावुक झाले. बहिणीचं निधन झालं, त्यानंतरच्या पहिल्या दिवाळीत मी कुटुंबापासून खूप दूर न्यूयॉर्कमध्ये होतो. तिच्या निधनानंतर माझ्यासाठी सण आधीप्रमाणे राहिले नाहीत, सणांचा उत्साह कमी झाला आहे, असं खन्ना भावुक होत म्हणाले.

पाहा व्हिडीओ-

उषा नाडकर्णी व विकास खन्ना यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले आहेत. या दोघांनी आपली भावंडं गमावली, त्यांच्याबद्दल बोलताना दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले ते पाहून चाहते कमेंट्स करून त्या मजबूत राहण्यास सांगत आहेत. आयुष्यात कुटुंब खूप महत्त्वाचे आहे, दुःखामुळे माणसं जोडली जातात, हेच भारताचं सौंदर्य आहे, अशा कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रोमो समोर आल्यानंतर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा आगामी भाग हा खूप भावनिक असेल असं दिसत आहे. इतर सेलिब्रिटी कोणत्या सणांचं महत्त्व सांगतील आणि कोणते पदार्थ बनवतील, हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.