Usha Nadkarni on Farah Khan: उषा नाडकर्णी यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम करीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या मराठी चित्रपटांतील भूमिकांना जितके प्रेम मिळाले, तितकेच प्रेम त्यांना मराठी-हिंदी मालिकांतील भूमिकांसाठीही मिळाले.

उषा नाडकर्णी अभिनयाबरोबरच त्यांच्या स्पष्टवक्तपणेसाठी ओळखल्या जातात. त्यांनी केलेली वक्तव्ये चर्चेत असतात. आता उषा नाडकर्णींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पिंकविलाशी संवाद साधताना त्यांनी फराह खानबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे.

फराह खानबद्दल उषा नाडकर्णी म्हणालेल्या…

‘पिंकविला’ने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी त्यांना विचारलं की, फराह खानबरोबर तुमचं नातं कसं आहे? त्यांनी बनवलेलं जेवण लोकांना खूप आवडतं. त्यावर उषा नाडकर्णी म्हणाल्या, “ती काही बनवत नाही. ती कुठे काय बनवते. ती लोकांच्या घरी जाते. ते स्वयंपाक करतात. दिलीप त्यांना मदत करतो. फराह काहीच करीत नाही. ती फक्त सतत लोखंडवाला परिसरात मिळणाऱ्या चिकनचं कौतुक करते.”

उषा नाडकर्णी या सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्या सीझनमध्ये फराह खान परीक्षकाच्या भूमिकेत होती. गौरव खन्ना या सीझनचा विजेता ठरला.

मास्टर शेफमधील इतर स्पर्धकांबद्दल उषा नाडकर्णी काय म्हणालेल्या?

उषा नाडकर्णी यांनी एका मुलाखतीत मास्टर शेफमधील इतर स्पर्धकांबद्दल वक्तव्य केले होते. गौरव जास्त बोलायचा नाही. तर, निक्की तांबोळी स्वत:ला मोठी अभिनेत्री समजते. तिच्या नजरेत आपण कोणीही नाही. ती इतर लोकांमध्ये फार मिसळत नसे. अर्चना गौतम जेव्हा शोमध्ये होती, तेव्हा तिचं हसणं आणि आवाज आवडायचा नाही. पण, त्यानंतर आमच्यात चांगली मैत्री आहे, असे वक्तव्य उषा नाडकर्णी यांनी केले.

त्याबरोबरच अंकिताबरोबरच्या बॉण्डिंगबाबतही त्यांनी वक्तव्य केले. आमच्यात कधीतरी बोलणे होतं. मध्यंतरी मी तिच्या घरी गेले होते, असे त्या म्हणाल्या होत्या.

आता आगामी काळात उषा नाडकर्णी कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.