This Bollywood Actress Was Rejected For Not Being Fair : रंग, रुप, दिसणं हे कलाविश्वात काही प्रमाणात का असेना पण महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे अनेकदा काही कलाकारांना नकार मिळत असल्याचं पाहायला मिळतं. अशातच आता लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रीने तिच्या रंगामुळे तिला नकार मिळाल्याबाबत सांगितलं आहे.
बॉलीवूड अभिनेत्री म्हटलं की पहिला शब्द आठवतो तो म्हणजे ग्लॅमरस. त्यामुळे रंग रुपावरून नकार मिळाल्याचं यापूर्वीसुद्धा कलाकार सांगताना दिसले. आता बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीने असाच काहीसा प्रकार तिच्यासह घडल्याचं सांगितलं आहे. अलीकडेच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री वाणी कपूरने तिला आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.
वाणी कपूरने रंगामुळे तिला नकार मिळाला असल्याचं सांगितलं आहे. ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “एका चित्रपटनिर्मात्याने एका भूमिकेसाठी मला मी रंगाने तितकी गोरी नसल्याने नाकारलं होतं.” पुढे अभिनेत्रीने तिला तिच्या शरीरयष्टीमुळेसुद्धा अनेकदा बोललं गेलं असल्याचं सांगितलं आहे.
वाणी याबाबत म्हणाली, “मला नेहमी मी खूप बारीक आहे त्यामुळे ऐकावं लागतं. बरेचजण मला खात जा, वजन वाढव असं म्हणत असतात. पण, मला मी जशी आहे तशीच आवडते. मला माझ्यामध्ये कोणताही बदल करावासा वाटत नाही. मी फिट आणि निरोगी आहे. मला अशा गोष्टींचा फार फरक पडत नाही. काही वेळेला आपल्याला माहीत नसतं, पण काही लोक आपल्याला चांगल्या हेतूनेही सांगत असतात. तरी मला मी जशी आहे तशीच आवडते.”
वाणी कपूर अलीकडेच तिच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटामुळे चर्चेत आली होती. २२ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने देशात पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटांवर बंदी आणली होती. वाणीच्या या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फावद खान मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु यावर बंदी आणण्यात आली.
वाणी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर सध्या ती तिच्या ‘मंडला मर्डर्स’ या वेब सीरिजचं प्रमोशन करत आहे. ही एक क्राईम थ्रीलर सीरज आहे. यामध्ये ती एका हुशार तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेतून झळकणार आहे. या वेब सीरिजचं साहाय्यक दिग्दर्शन गोपी पुथरन व मनन रावत यंनी केलं आहे, ज्यांनी राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.