Vaishnavi Kalyankar’s Sister Shared A Video : वैष्णवी कल्याणकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. वैष्णवी नेहमी सोशल मीडियामार्फत तिच्या कामासंबंधित अपडेट तसेच खासगी आयुष्यातील गोष्टी प्रेक्षकांसह शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीसाठी तिच्या बहिणीनेही खास पोस्ट केली आहे.
वैष्णवी कल्याणकर अनेकदा तिच्या कुटुंबीयांबरोबरचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. गणेशोत्सवनिमित्त तिने तिचा नवरा किरण गायकवाडबरोबरचे खास फोटो व व्हिडीओ शेअर केले होते. अशातच आता तिच्यासाठी तिची बहीण इश्वरी कल्याणकर हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
वैष्णवी कल्याणकरचं बहिणीकडून कौतुक
अभिनेत्रीच्या बहिणीने तिचं कौतुक करत ही पोस्ट केली आहे. यावेळी तिने तिच्या आई-वडिलांबरोबर गाडीतून प्रवास करत असताना त्यादरम्यान वैष्णवीचं मोठं होर्डिंग पाहून व्हिडीओ शूट करत तो पोस्ट केला आहे. तिने या व्हिडीओला खास कॅप्शनही दिलं आहे. वैष्णवीबद्दल तिची बहीण म्हणाली, “तुझी कलाकार होण्याची धडपड तर लहानपणापासून चालू झालेली… तुझं तेच स्वप्नं होतं कायम. तू जिद्दीने अणि स्वबळावर ते पूर्णपण केलंस.”
वैष्णवीबद्दल इश्वरी पुढे म्हणाली, “आज सांगायला अभिमान वाटतो की मी तुझी बहीण आहे. कोणाचाही पाठिंबा नसताना, फिल्मी बॅकग्राउंड नसताना तू हे सगळं सत्यात आणलस ह्याचं कौतुक वाटतं. जास्त बोलता येत नाहिये, पण तुझा खूप अभिमान वाटतो… आई बाबा कायम कौतुकाने तुझ्याबद्दल बोलतात, कोणी विचारलं तर एकदम आनंदाने सांगतात की माझी मुलगी चित्रपटामध्ये काम करते , मालिकेमध्ये काम करते, अभिनेत्री आहे ती… त्यात पण एक वेगळीच मज्जा आहे; अशीच खूप मोठी हो.”
दरम्यान, वैष्णवीबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच ‘घाबडकुंड’ या आगामी चित्रपटातून झळकणार आहे. परंतु, यामध्ये ती कोणती भूमिका साकारणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. यामधून ती पहिल्यांदाच अभिनेते देवदत्त नागे यांच्याबरोबर झळकणार आहे.