Veen Doghatli Hi Tutena upcoming twist: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत दररोज नवीन काहीतरी घडताना दिसत आहे. स्वानंदी व समर यांच्यामधील मतभेदांमुळे त्यांच्यात छोटी-मोठी भांडणे होताना दिसतात.
समर व स्वानंदी यांचे स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध असल्याने ते एकमेकांशी सतत भांडत असतात. असे असले तरी स्वानंदीचा भाऊ रोहन व समरची बहीण अधिरा यांच्यासाठी ते एकमेकांशी समजूतीने वागण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये ट्विस्ट
रोहन व अधिरा हे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. त्यांना एकमेकांशी लग्न करायचे आहे. त्यांच्या नात्याबद्दल जेव्हा त्यांनी घरी सांगितले तेव्हा दोन्ही कुटुंबांनी एकत्र भेटण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी रोहनची नंदूताई म्हणजेच स्वानंदी आहे आणि अधिराचा पिंट्यादादा म्हणजे समर असल्याचे त्या दोघांना समजले. आता मालिकेत ट्विस्ट येणार आहे. काकूच्या सांगण्यावरून समर रोहनला घरजावई होण्यासाठी विचारणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते.
झी मराठी वाहिनीने वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, समर व स्वानंदी या दोघांची कुटुंबे एकत्र जमली आहेत. रोहन व अधिराच्या लग्नाची पुढची बोलणी करण्यासाठी सर्व जण एकत्र आले आहेत. प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आजी सर्वांना म्हणते की, ज्यासाठी आपण जमलो आहोत, ते आधी करूयात. आधी लग्नाची पुढची बोलणी करूयात.
समर म्हणतो की, रोहनला प्रश्न पडला होता त्यावरचा उत्तम उपाय सापडला आहे. त्यावेळी समरला त्याच्या काकूने सांगितल्याप्रमाणे सर्वांपुढे तो रोहनला विचारतो की, तू जर घरजावई म्हणून आमच्या घरी आलास तर? त्यावर रोहन सर्वांना स्पष्ट सांगतो की, मला घरजावई होण्याचा पर्याय मला मान्य नाही. त्यावर समर म्हणतो की, आपण याचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे. मग समर कुटुंबासह निघून जातो.
समरचे कुटुंब गेल्यानंतर स्वानंदीची आई घरच्यांना म्हणते की, मी त्याला जंगलात जाऊन राहा, असं म्हणत नाही. तो तिथे ऐषारामात राहिला असता. त्यानंतर स्वानंदी स्पष्ट शब्दांत सांगते की, घरजावई होण्याची कल्पना मला पटलेलं नाही. मी रोहनच्या बरोबर आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘रोहन घरजावई होण्यास तयार होईल का?’, अशी कॅप्शन दिली आहे.
आता रोहन व अधिराचे लग्न यामुळे मोडणार का, स्वानंदी यावर कसा उपाय शोधणार, अधिराची प्रतिक्रिया काय असणार, समर यावर काय विचार करणार, रोहन काय निर्णय घेणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.