Why Usha Nadkarni Work In Age 79: ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या त्यांच्या भूमिकांसाठी ओळखल्या जातात. ‘माहेरची साडी’, ‘अगडबंब’, ‘नशीबवान’ अशा अनेक चित्रपटांत त्या दिसल्या आहेत. तसेच त्यांनी मालिकांमध्येदेखील काम केले आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे आजही कौतुक होताना दिसते.
काम करत राहिलं की…
उषा नाडकर्णी यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ७९ व्या वर्षीही त्या काम करतात, याबाबत वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, “आता या वयात मी फक्त बसून राहिले, तर माझे हात-पाय कडक होतील. माझी आई ८३ व्या वर्षी गेली. तिनं कधीच मला बरं नाही, अशी तक्रार केली नाही. फक्त बसून राहिलं की, फक्त बसावंसं वाटतं.”
“काम करीत राहिलं की, काही वाटत नाही. घरी माझं जेवण मी करते, माझा डबा मी करते. शूटिंगला जाताना सकाळी ५ ला उठून मी माझं सगळं करते. डबा घेऊन जाते. त्यामुळे काम करण्याबद्दल काही वाटत नाही. तुम्ही त्याबद्दल अतिशयोक्ती केली, तर वाटतं. तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नाहीत, तर काही वाटत नाही.”
पुढे उषा नाडकर्णी मुलाबाबत म्हणाल्या, “माझ्या मुलाचं आणि माझं नातं छान आहे. पण, लहानपणी मला त्याच्याकडे लक्ष देता आलं नाही. कारण- मी एकाच वेळी नोकरी करायचे, शूटिंगदेखील करायचे, नाटकातदेखील काम करायचे. त्यामुळे मुलाला सांभाळणं, हा एक मोठा प्रश्न असतो. पण, माझ्या आईमुळे माझा तो प्रश्न सुटला. माझ्या मुलाचं सगळं माझ्या आईनं केलं.”
“आता मास्टरशेफमध्येसुद्धा मी बोलले की, मला माझ्या मुलाला मोठं होताना बघता आलं नाही. कारण- नाटक म्हटलं की, दिवस-रात्र सण असं काही नसतं. पळापळ असायची. अशा वेळी मुलांचे हाल होतात. आई निवृत्त झाली होती. त्यामुळे आईनं मुलाकडे लक्ष दिलं. त्यामुळे तो आई-पप्पांकडेच राहिला. माझ्या आईला तो आई म्हणायचा. तो मला म्हणतो की, तू मला जन्म दिलास; पण माझी आई ती आहे. माझे पप्पा लवकर गेले. माझा मुलगा सहा वर्षांचा असताना माझे वडील गेले. त्यानंतर माझ्या भावानं त्याचं सगळं केलं.”
दरम्यान, उषा नाडकर्णी या चित्रपट, मालिकांबरोबरच रिअॅलिटी शोमध्येही दिसल्या आहेत. ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या पर्वात त्या दिसल्या होत्या. तसेच नुकत्याच त्या सेलिब्रिटी मास्टरशेफच्या पहिल्या सीझनमध्येदेखील दिसल्या होत्या. आता आगामी काळात त्या कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.