Raj More on Tejashri Pradhan: ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून राज मोरे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एजेचा मुलगा, सरूचा नवरा विराज ही भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली.

आता राज मोरे झी मराठीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने या मालिकेत रोहन सरपोतदार ही भूमिका साकारली आहे. स्वानंदीचा भाऊ म्हणून तो दिसणार आहे.

या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकार काम करताना दिसत आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान व सुबोध भावे हे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. स्वानंदी आणि समर या भूमिकांतून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत.

तेजश्री प्रधानबाबत राज मोरे काय म्हणाला?

आता अभिनेता राज मोरेने तेजश्री प्रधानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. राज मोरेने ‘मराठी सीरियल्स ऑफिशियल’शी साधलेल्या संवादात अभिनेता म्हणाला, “पहिल्यांदा असं होत आहे की, मी एका मध्यमवर्गीय मुलाच्या भूमिकेत दिसत आहे. माझ्या भूमिकेचं नाव रोहन आहे. रोहन खूप शांत, मेहनती मुलगा आहे. त्याचं स्वप्न आहे की, त्याला आपल्या स्वानंदीताईचं लग्न करायचं आहे. त्याला स्वतःच करिअर घडवायचं आहे, जेणेकरून तो अधिराचा भाऊ म्हणजेच समर राजवाडेसमोर स्वतःला सिद्ध करू शकेल. समरनं रोहन-अधिराच्या नात्याला आनंदानं स्वीकारावा यासाठी रोहनला स्वत:ला सिद्ध करायचं आहे.”

“जेव्हा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका संपल्यानंतर मी काही भूमिकांसाठी ऑडिशन्स देत होतो तेव्हा या भूमिकेबद्दल मला समजलं. मॉकशूट आणि रिडींग झालं. त्यानंतर मला मेसेज आला की, आपण हा शो करत आहोत. जेव्हा प्रोमो टीव्हीवर आला तेव्हा एकदम भारी वाटलं. माझ्या आईला एकदम भरून आलं. कारण- शाळेत असल्यापासून झी मराठी बघतोय आणि त्या चॅनेलवर माझा प्रोमो येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या मित्रानी माझं अभिनंदन केलं.”

शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगताना राज मोरे म्हणाला, “माझा आणि तेजश्रीताईचा पहिला सीन शूट होत होता आणि मला प्रचंड दडपण आलं होतं. त्याबद्दल मी तिलाही सांगितलं. ती मला म्हणाली की, मीसुद्धा एकेकाळी सीनियर कलाकाराबरोबर काम केलं होतं आणि मलासुद्धा त्यावेळी दडपण आलं होतं. असं दडपण येणं साहजिक आहे.”

“तिनं मला कम्फर्टेबल केलं. त्यानंतर आमचं नातं खूप छान फुलून आलं आणि हेच ऑनस्क्रीन आमचं भावा-बहिणीचं तुम्हाला बघायला मिळणार आहे. किशोर महाबोले जे माझ्या वडिलांची भूमिका साकारत आहेत, त्यांच्याशी छान मैत्री झाली आहे. सुलभा आर्यामॅमना मी पहिल्याच दिवशी जाऊन सांगितलं की, मला तुमच्याकडून तुमच्या शूटचे आणि शाहरुख खानचे किस्से ऐकायचे आहेत.”

आता मालिकेत काय गमती-जमती घडणार, मालिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.