Vin Doghantali Hi Tutena Promo : तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. हे स्टार कलाकार या मालिकेत समर आणि स्वानंदी या प्रमुख भूमिका साकारत आहेत. ही मालिका सुरू झाल्यापासून अद्याप एकदाही समर-स्वानंदीची भेट झालेली नाहीये.

स्वानंदी आणि समर या दोघांनी मालिकेत आतापर्यंत फक्त अप्रत्यक्षरित्या एकमेकांशी संवाद साधला होता, अद्याप ते एकमेकांच्या समोर आले नव्हते. अखेर ज्या क्षणाची सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण मालिकेत लवकरच येणार आहे.

समर आणि स्वानंदीमध्ये सध्या वृद्धाश्रमाची जागा आणि स्वानंदीची आई मंदाकिनी सरपोतदार यांच्यावरून मोठा वाद सुरू असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे. अर्थात या सगळ्याला कारणीभूत असतो अंशुमन राजवाडे. त्याला काहीही करून बिझनेससाठी वृद्धाश्रमाची जागा हडप करायची असते. त्यामुळेच तो समरच्या मनात स्वानंदीबद्दल विष कालावतो. यामुळे काहीही झालं तरी वृद्धाश्रमाची जागा आपल्यालाच मिळाली पाहिजे असा ठाम निर्णय समर घेतो. अर्थात, स्वानंदीचा याला तीव्र विरोध असतो कारण, आश्रम सोडल्यावर तेथील वयोवृद्धांचं काय होणार असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात फिरत असतात.

अखेर स्वानंदी कंटाळून समरची प्रत्यक्ष भेट घेण्याचा निर्णय घेते. ती थेट समरच्या ऑफिसमध्ये जाऊन पोहोचते. त्याच्या केबिनमध्ये पोहोचताच ती विचारते, “तुम्ही समर राजवाडे आहात का?” इतक्यात एका मुलीच्या धक्क्याने स्वानंदीचा तोल जातो आणि तिला समर सावरतो असा सीन पाहायला मिळणार आहे. या दोघांवर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण होणार आहे.

यानंतर दोघांमध्ये वृद्धाश्रमाबद्दल औपचारिकपणे चर्चा होते. ती म्हणते, “माझं नाव स्वानंदी सरपोतदार आहे. माझी इथे येण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण, मला दुसऱ्यांबद्दल काहीतरी वाटतं म्हणून इथे आले…तुमच्यासारखी कोरड्या मनाची मी नाहीये.” यावर समर तिला म्हणतो, “तुमची इथे यायची हिंमत कशी झाली? आम्ही सगळ्या गोष्टी कायद्याने करतो. तुमच्यासारख्या आणि तुमच्या आईसारख्या गोष्टी आम्ही करत नाही…माझी ४ मिनिटं १३ सेकंद तुमच्यामुळे वाया गेली.”

यानंतर स्वानंदी रागात चिडून समरला “घड्याळ आहे हा…” असं म्हणते. समर-स्वानंदीमध्ये ऑफिसच्या केबिनमध्ये प्रचंड वाद होतात. हा विशेष भाग २६ ऑगस्टला प्रसारित केला जाणार आहे.

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका रोज सायंकाळी ७:३० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते. आता स्वानंदी-समरच्या नात्यातील गैरसमज दूर होणार की अजून वाढणार? हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.