Actress Vishakha Subhedar : विनोदाचं अचूक टायमिंग साधत तमाम मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखलं जातं. आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये विशाखाचा दमदार अभिनय प्रेक्षकांनी पाहिला आहे. याशिवाय तिने अनेक कॉमेडी शोजमध्येही सहभाग घेतला होता. हास्यजत्रेचे चाहते विशाखाने शो सोडल्यावरही तिची आवर्जून आठवण काढतात. प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून एका वेगळ्या रुपात सर्वांच्या भेटीला येत आहे.
‘स्टार प्रवाह’च्या ‘शुभविवाह’ मालिकेत विशाखा सुभेदार नेहमीपेक्षा वेगळी खलनायिकेची भूमिका साकारत आहे. मालिकांचं शूटिंग अलीकडच्या काळात १२ तासांहून अधिक वेळ सुरू असतं. त्यामुळे जेव्हा लवकर पॅकअप होतं तेव्हा, सगळ्याच कलाकारांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
विशाखा सुभेदार देखील सोमवारी (१६ जून ) लवकर पॅकअप झाल्याने प्रचंड आनंदी होती. पण, वाटेत असं काही घडलं की अभिनेत्री तब्बल साडेतीन तासांनी घरी पोहोचली. विशाखा ज्या मार्गाने प्रवास करते त्याठिकाणी मध्येच झाड पडलं होतं. त्यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. झाड पडल्यामुळे सगळ्या गाड्या एकाच ठिकाणी थांबून राहिल्या होत्या. ही परिस्थिती पाहून विशाखाचा हिरमोड झाला. खरंतर, छान वातावरण अन् जोरदार पाऊस पडत असल्याने विशाखा लवकर घरी जाण्याच्या विचारात होती पण, नेमकं उलटं घडलं….
विशाखा सुभेदार म्हणाली, “आज माझं लवकर पॅकअप झालं. खूप छान वातावरण होतं…म्हटलं वाह! चला लवकर घरी जाऊयात… मी आमच्या मढ याठिकाणी असलेल्या शूटिंगच्या सेटवरून बाहेर पडले…थोडी पुढे आले आणि मग गाडी एकाच जागी थांबून राहिली. छान ढगाळ वातावरण, पाऊस पडतोय… पावसाची गाणी ऐकतेय आणि एकाच ठिकाणी मी थांबलीये. तर, यामागचं कारण असं आहे की, आज माझ्या नशिबावर झाड पडलंय. आता क्रेन येणार, महापालिकेचे कर्मचारी येणार…मग ते झाड बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू होणार आणि मग ट्राफिक सुटणार…पण अजून काय बोलू छान वाटतंय. लवकर सुटल्याचा जो काही आनंद आहे… ( उपरोधिकपणे ) वाह वाह! ६:३० वाजता लवकर पॅकअप झाल्यानंतर निघाले आणि आता रात्री १० वाजता घरी पोहोचले… कधीतरी आनंदावर झाड आडवं येतं!”
दरम्यान, विशाखा सुभेदारच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “नशिबावर झाड पडलं भारी कॅप्शन”, “एक दिवस निसर्गाला शरण जा”, “थँक गॉड…. तुम्ही सुरक्षित आहात ना…” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.